तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ : पवारांना घातले साकडे
नारायणगाव (वार्ताहर) – यंदा करोना आणि लॉकडाऊनमुळे तमाशाचा हंगाम (तीन ते चार महिन्यांचा) वाया गेल्याने सुमारे 30 फड मालकांचे 6 ते 7 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांना संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. तरी लोककलावंतांना राज्य शासनाने अनुदान देऊन तमाशा फड मालकांना बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे
केली आहे.
राज्यात 2018 ते 2019 मध्ये दुष्काळ व अवकाळी पाऊस, 2019 ते 2020 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासून करोना व्हायरसमुळे राज्यातील लोकनाट्य तमाशा मंडळांना आर्थिकदृष्ट्या झळ सोसावी लागत आहे. राज्यामध्ये सात महिने तबुंच्या फडाचे कार्यक्रम सुरू असतात. विजया दशमी ते बौद्ध पौर्णिमा या कालावधीत चालणारे तमशा फड व गुढी पाडवा ते बौद्ध पौर्णिमापर्यंत चालणारे यात्रा (गावची) साजरी करणारे हे फड दीड महिना कालावधीत काम करतात.
यंदाच्या वर्षीचा हंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे तमाशा फडाचे प्रत्येकी अंदाजे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे. राज्यातील तमाशा कलावंतांच्या कुटुंबातील संख्या सरासरी 5 ते 6 सदस्य धरल्यास 1 लाख 64 हजार 635 एवढी असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे सरकारने सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून वित्त व नियोजन, सांस्कृतिक मंत्री यांच्या सोबत आर्थिक मदत व धोरण ठरवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी परिषदेच्या वतीने अविष्कार मुळे, संभाजी जाधव व मोहित नारायणगावकर यांनी केली आहे.
परिस्थितीला तोंड देताना नाकीनऊ
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक तमाशा फड मालकांनी परिस्थिीतीनुसार संबंधित कालाकारांना मदत केली असून ती अन्नधान्य, औषधे, संसार उपयोगी साहित्यांची मदत झाली; परंतु आताच्या परिस्थितीला तोंड देताना नाकीनऊ आल्याने अखेर शरद पवारांना साकडे घातले असल्याचे मंगला बनसोडे यांनी सांगितले.