संयुक्तराष्ट्रे – सदस्यत्व फी ची थकबाकी न भरल्याने संयुक्तराष्ट्रांतील सात राष्ट्रांचा मताधिकार काढून घेण्यात आला आहे. संयुक्तराष्ट्रांचे प्रवक्ते दुजार्रिक यांनी आज सांगितले की गांबिया, लेसोथो, टोंगा, येमेन, व्हेनेझुएला, आणि लेबनॉन या देशांनी आपला मताधिकार गमावला आहे. कोमोरोस, साओ टोमे, आणि प्रिंसिपी व सोमालिया या देशांचीही थकबाकी असून त्यांना सप्टेंबर पर्यंतच मताधिकार राहील त्यानंतरही त्यांनी जर हे पैसे जमा केले नाहीत तर त्यांचाहीं मताधिकार काढून घेतला जाणार आहे. संयुक्तराष्ट्रांमध्ये एकूण 193 सदस्य देश आहेत. त्या सदस्यांना नियमीतपणे सभासदत्व फी भरावी लागते. जी राष्ट्रे आपली सदस्यत्व फी भरत नाहीत त्यांच्यावर अशा स्वरूपाची कारवाई केली जाते.
ज्यांचा मताधिकार रद्द करण्यात आला आहे त्या देशांतील आर्थिक स्थिती खालावलेली असल्यानेच त्यांनी ही देणी दिली नाहींत असे सांगण्यात येते. व्हेनेझुएला मध्ये तर आर्थिक अनागोंदीच निर्माण झाली असून सन 2015 पासून त्या देशातील सुमारे 45 लाख लोकांनी अन्य देशांमध्ये पलायन केले असल्याचे सांगण्यात येते. तेथे नागरीकांना नोकऱ्या नाहीत, सुरक्षा नाही आणि राजकीय अनागोंदीची स्थिती कायम असून तेथे महागाई तर गगनाला भिडली आहे. त्यामुळे लोकांना त्या देशात राहणेच अवघड होऊन बसले आहे.
लेबनॉन मध्येही आर्थिक संकट मोठे आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून तेथील हजारो लोक नियमीतपणे रस्त्यावर येऊन आपल्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने करीत आहेत.