पिंपरी – मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण समितीचे सदस्य असल्याचे सांगून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली. ही घटना रामनगर, रहाटणीा येथील मे. बालाजी ट्रेडर्स या दुकानात शुक्रवारी (दि. 10) घडली.
हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी आणि एक महिला आरोपी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरजाराम रूपाराम चौधरी (वय 37, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शनिवारी (दि. 11) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी हिने फिर्यादी यांच्या भावाच्या दुकानात सामान खरेदी केले.
त्यानंतर ते सामान बनावट असल्याचे सांगत आपल्या साथीदारांना बोलविले. त्यांनी मग तुझ्या भावाला खडी फोडायला तुरूंगात पाठवतो, अशी धमकी देत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पैसे कमी करीत दोन लाखांवर आरोपींनी मांडवली करण्याची तयारी दर्शविली. तसेच भावाच्या खिशातील साडेआठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार याबाबत अधिक तपास करीत आहेत.
ते नाटक पडले महागात
आरोपी सतीश केदारी हा या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असून आरोपी निवगुणे हा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला धमकावण्यासाठी पोलिसांना फोन लावण्याचे नाटक केले. मात्र खरोखच पोलिसांना फोन लागला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी हे बनावट साहित्य विकत असल्याचा कांगावा आरोपींनी केला. पोलिसांनी पंचनामा करीत साहित्य जप्त केले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत फिर्यादी यांच्याकडे खंडणी मागितल्याची बाब समोर आली. तसेच फिर्यादी यांच्या भावाच्या खिशातून पैसे काढून घेत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.