मुंबई – जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यांनी केलेला दोष मुक्ततेसाठीचा अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावत शिवडी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केलले अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचे स्पष्ट करत वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे नवनीत राणा यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.
जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात या दोघांविरुद्ध दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
या निणर्याविरोधात नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने हा निर्णय योग्यच असल्याचे सांगितले. दरम्यान नवनीत राणा यांना स्वत: महानगरदंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्राप्रकरणी 2014 साली मुलूंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.