तळेगाव दाभाडे – शहरातील दुय्यम निबंधक मावळ दोन या कार्यालयात मागील तीन दिवसापासून सर्व्हर स्लो असून कामकाज ठप्प आहे. त्यामुळे दस्त नोंदणीला आलेल्या नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच तळेगाव दाभाडे येथील सुसज्ज अशा नूतन इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयामध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असून खरेदी विक्री व इतर व्यवहारापोटी सरकारला लाखो रुपयांचा महसूल मिळत आहे. असे असताना ऑनलाईन यंत्रणेमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे नागरिक त्रस्त असून त्यांच्या वेळेची किंमत सरकारला कळणार का ? असा सवाल दस्तनोंदणीकरिता आलेले नागरिक करीत आहेत.
मागील तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्त नोंदणीला अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे दिवसभर सर्व्ह सुरु होण्याची वाट पहावी लागत असल्याने दस्तावर स्वाक्षरी करणारे साक्षीदार व विक्री करणारे या सर्वांचा हॉटेलचा खर्च, वेळप्रसंगी मुक्कामाचा खर्च करावा लागत असल्याने खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. वकिलांना ही दिवसभर पक्षकारासोबत दस्त नोंदणी होईपर्यंत वाट पहावी लागते. वेळ व पैसा वाया जात असल्याचे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात मागील तीन दिवसांपासून दस्त नोंदणी बंद आहे. यामुळे पक्षकारांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. अनेक नोकरदार रजा घेऊन दस्त नोंदणीला येतात. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून वेळेच्या अपव्ययाला सामोरे जावे लागत आहे.
ऍड. हर्षवर्धन काटकर
तळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हरला अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठांशी बोलणं केले आहे. लवकरात लवकर तांत्रिक अडचण दूर केली जाईल.
-वी. बा. झिंगाडे, दुय्यम निबंधक