पुणे – “गणपती विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांना तीन, तर उर्वरित मंडळांना फक्त दोन ढोल ताशा पथकांची परवानगी दिली जाते. हा भेदभाव दूर करून सर्व मंडळांसाठी ढोल-ताशा पथकांची आणि पथकातील ढोल व ताशांची संख्या निश्चित करावी. पथकांची संख्या मर्यादित ठेवली, तर मिरवणूक लवकर संपवता येईल,’ अशी भूमिका गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या बैठकीत मांडली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी मानाचे गणपती मंडळांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यामुळे उर्वरित गणेश मंडळांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी माफी मागत या वादावर पडत टाकला. तसेच गुरुवारी टिळक रस्त्यावरील दुर्वांकुर हॉल येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते.
त्यानुसार गुरुवारी गणपती मंडळाची बैठक पार पाडली. यावेळी गणपती मंडळांनी “सगळ्या मंडळांना एकसमान नियम लावावेत. बॉक्स कमानी संख्या वाढवण्यात याव्यात यामुळे मंडळांना जास्त उत्पन्न मिळेल. मंडळाला दर वर्षी परवण्यायसाठी प्रशासनाकडे जावे लागते. तर एकाच वेळी पाच वर्षांची परवाना दिला तर योग्य होईल. गणेशोत्सव काळात भाविकांना शाळांमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळानी केल्या. या बैठकीला पुणे पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, , विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.
“सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस आपण मिळून काम करून या. शहरात काही दिवसांपूर्वी दहशतवादी सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर संशयास्पद काही आढळून आढळल्यास पोलिसांना कळवावे. तसेच सगळ्यांनी दक्ष राहावे. गणेश मंडळांच्या सूचनांनुसार लवकरच नियमावली तयार केली जाईल. तसेच पुढील बैठकीत धोरण ठरविण्यात येईल,” – डॉ. संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त
गणेश मंडळांनी मांडलेल्या मागण्या
- लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो. यासाठी नियोजन आवश्यक.
- टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे
- मिरवणुकीदरम्यान स्वारगेट चौकात तिन्ही बाजूंनी गणेश मंडळे येतात. त्यावेळी गोंधळ होतो. त्यामुळे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे.
- स्वारगेट चौक, पुरम चौक (अभिनव महाविद्यालय) चौकात पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी.
- नेहरू स्टेडियमजवळ दुचाकी पार्क केल्या जाऊ नयेत.