पुणे – डोक्यावर फेट्यांचा साज चढवत सभागृहात प्रवेश.. प्रसन्न वातावरणाने बहरलेले सभागृह… गावात आपण केलेल्या कामांची चित्रफित स्क्रीनवर सुरू असताना “आदर्श सरपंच’ पुरस्काराचे नाव जाहीर करत सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान…त्याचवेळी टाळ्यांचा कडकडाट…अशा उत्साहपूर्ण आणि आनंददायक वातावरणात हा कौतुक सोहळा पार पडला.
निमित्त होते, दैनिक प्रभातने आयोजित केलेल्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याचे… “हा सोहळा आम्हाला उर्जा देणारा आणि विकासकामाची पोचपावती’ असल्याच्या भावना सरपंचांनी व्यक्त केल्या. विकासकामांना गती देत गावाचा कायापालट करणाऱ्या “सरपंचां’च्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी दैनिक “प्रभात’ने या सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन केले होते. या सोहळ्यात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांची गर्दी सुरू झाली.
सभागृहात प्रवेश करताना सर्व सरपंचांना जरीचे फेटे बांधण्यात आले. यावेळी सरपंचांकडून सेल्फी काढण्याची लगबग सुरू झाली. मान्यवरांचा सत्कारानंतर प्रत्येक सरपंचाने गावात केलेल्या विकासकामांची चित्रफित दाखविण्यात आली. तर पालकमंत्री व सीईओ यांच्या हस्ते सरपंचांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार घेताना सरपंचाच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान दिसून येत होते. यावेळी पालकमंत्र्यांनीही कुटुंबाप्रमुखाप्रमाणे सरपंचांची विचारपूस करत त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सोहळा आनंदीमय वातावरणात पार पडला.
सरपंच म्हणतात…
“हा सोहळा आम्हाला उर्जा देणारा ठरणार आहे. आम्ही केलेल्या विकासकामांची ही जणू पोचपावतीच आहे.”
सोहळ्यातील क्षणचित्रे…
- विकासाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करणाऱ्या सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
- भव्य-दिव्य सभागृहात प्रवेश करताना सर्व आदर्श सरपंचांना जरीचे फेटे
- सरपंचाने गावात केलेल्या विकासकामांच्या चित्रफितीचे शानदार सादरीकरण