पुणे – सावली संस्थेतील 45 वर्षांवरील विशेष मुलांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सोमवारी संस्थेत पार पडले. बौद्धिक क्षमता असून शारीरिक परावलंबत्व आणि बोलू न शकणाऱ्या या मुलांसाठी लसीकरण ही वेगळीच गोष्ट होती.
या विशेष मुलांना संस्थेबाहेर नेणे अडचणीचे असल्याने त्यांचे संस्थेतच लसीकरण करण्याची मागणी महापालिकेस करण्यात आली होती. या मुलांची स्थिती आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने हे लसीकरण केले, असे संस्थेच्या व्यवस्थापिका मयुरी कुलकर्णी यांनी सांगितले. अशा प्रकारचा संस्थेत जाऊन लसीकरणाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
करोना संकटाच्या काळात या मुलांना संसर्गाचा धोका असल्याने त्यांचे पालकही मागील दीड वर्षांत भेटू शकलेले नाहीत. तर या मुलांचे आरोग्य पाहता त्यांनाही संसर्गाचा धोका आहे. त्यानुसार महापालिकेला विनंती करून पहिल्या टप्प्यात 45 वर्षांवरील विशेष मुलांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
“सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्न आणि बहुविकलांग मुलांना लस देणे, हे खूप अडचणीचे आहे,’ असे डॉ. संपदा यांनी लसीकरणानंतर सांगितले. तर, आमच्यासाठी हा क्षण खूप टिपण्यासारखा असल्याचे नर्स सविता पवार आणि राणी कांबळे यांनी सांगितले.
सर्वसामान्य माणूस आणि विशेष मुले यांमधला फरक ही लस देताना जाणवल्याचे “सावली’चे सर्वेसर्वा वसंत ठकार यांनी सांगितले. प्रत्येक मुलाचे मानसिक आणि शारीरिक प्रश्न वेगळे असतात. या मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. या मुलांचे उर्वरित आयुष्य सुखाचे होवो, हा यामागचा उद्देश आहे, असे सावलीचे वसंत ठकार यांनी सांगितले.