पिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’

ऑक्‍सिजनसाठी उद्योजकांची मागणी : 35 टक्‍के लघुउद्योग बंद

पिंपरी   – दिवसेंदिवस करोनाची रुग्णसंख्या घटल्याने ऑक्‍सिजनची मागणीदेखील कमी झाली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना पुरवून शिल्लक राहिलेला किमान 20 टक्‍के तरी ऑक्‍सिजन उद्योगांना उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी उद्योजक करू लागले आहेत.

ऑक्‍सिजनअभावी उद्योगनगरीतील सुमारे 35 टक्‍के लघुउद्योग बंद आहेत. जे उद्योग सुरू आहेत तेदेखील पूर्ण क्षमतेने उत्पादन करू शकत नाहीत. या परिस्थितीकडे लक्ष वेधत लघुउद्योजक आता थोडाफार तरी ऑक्‍सिजन देण्याची मागणी करत आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून उद्योग आणि उद्योजक करोनामुळे अडथळ्यांची शर्यत पार करत आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये करोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने उद्योगांना ऑक्‍सिजनचा पुरवठा होऊ लागला होता. मात्र, त्यानंतर करोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने अचानकपणे करोनाबाधितांची संख्या शेकडोंच्या संख्येने वाढू लागली. करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत, उत्पादित होणारा सर्व ऑक्‍सिजनचा पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला पुरविण्याचे आदेश देण्यात आले.

त्यामुळे एकमेकांवर अवलंबून असलेल्या उद्योगनगरीतील 35 टक्के लघुउद्योगांची साखळी बंद आहे. अनेक उद्योगांना ऑक्‍सिजनची नितांत गरज असते. ऑक्‍सिजनशिवाय त्यांचे काम चालू शकत नाही, अशा उद्योगांमधील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. सद्यस्थितीत राज्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली आहे. परिणामी ऑक्‍सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. मात्र, तरीदेखील उद्योगांमध्ये ऑक्‍सिजन वापरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

एकीकडे रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन कमी वापरला जात असल्याने रिफिलिंगसाठी निर्मिती प्रकल्पांममध्ये रिकामे सिलिंडर्स कमी प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे ऑक्‍सिजन अभावी बंद असलेले लघुउद्योग व त्यामुळे ठप्प झालेले अर्थकारण असे परस्परविरोधी चित्र पहायला मिळत आहे.

राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी पुरावा म्हणून ग्राह्य धरत, उद्योगांचा कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यासाठी उत्पादन होणाऱ्या एकूण ऑक्‍सिजनपैकी किमान 20 टक्के तरी ऑक्‍सिजन उपलब्ध करुन देण्याची पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची आग्रही मागणी आहे.

मानवी जीवन अमूल्य असून, जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, याबाबत दुमत नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असताना, रुग्णांना पुरवठा झाल्यानंतर शिल्लक राहणारा ऑक्‍सिजन उद्योगांना उपलब्ध करून देता येईल का? याचीदेखील पडताळणी व्हावी. भविष्यात रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची मागणी वाढल्यास पुन्हा सर्व पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला करावा.
– संदीप बेलसरे,
अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.