पाच कोटींचा घोटाळा; तुषार कामठे यांचा भाजपला घरचा आहेर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरवस्ती विभागातून महिला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था वादात अडकली आहे. निविदा न राबविता भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने थेट पद्धतीने पुन्हा एकदा त्याच संस्थेला काम देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या संस्थेची सखोल चौकशी करुन कोट्यवधी रुपयाचा चुराडा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
या संस्थेच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक तुषार कामठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सीएमओ पोर्टलवर तक्रार केली आहे. तुषार कामठे यांनी मागील काही वर्षात या संस्थेवर झालेल्या खर्चात सुमारे 5 कोटींची तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आयुक्तांनाही याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत. अखिल भारतीय संस्थेची चौकशी करण्याचा व या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्तावही काही महिन्यांपूर्वी स्थायीत मंजूर करण्यात आला होता. मात्र, चौकशी व ब्लॅक लिस्ट करण्याचा ठराव रद्द करून याच संस्थेला काम देण्यात आले. या संस्थेला काम देताना अनेक बाबी दडपण्यात आल्याचा आरोपही कामठे यांनी केला आहे.
दरम्यान, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने गेल्या दहा वर्षात किती महिला प्रशिक्षण देवून त्यांना स्वालंबी बनवले हे अद्याप कागदोपत्रीच आहे. अर्थिक वाटाघाटी झाल्यानेच निविदा न राबविता थेट काम दिले जात आहे. गेल्या दहा वर्षात एकाच लाभार्थ्यांना वेगवेगळे कोर्सचे प्रशिक्षण देवून लाभार्थी संख्या वाढवली जात आहे. या संस्थेची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत कामठे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
लाभार्थी संख्येत मोठी तफावत
कामठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2013-14 ते 2016-17 या चार वर्षांच्या कालावधीत 8115 प्रशिक्षणाच्या बॅंचेस झाल्याचे संस्थेच्या आकडेवारीवरून दिसते. तर, महापालिकेने दिलेल्या आकडेवारीम 8491 बॅचेस झाल्याचे नमूद आहे. दुसरीकडे लाभार्थ्यांची संख्या ठेकेदाराने 1 लाख 97 हजार 458 इतकी, तर पालिकेने 2 लाख 5 हजार 695 लाभार्थी अशी दाखविली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येप्रमाणेच खर्चात देखील 5 कोटींची तफावत आहे. चार वर्षात 52 कोटी 58 लाख 82 हजार 372 रुपये खर्च झाल्याचे ठेकेदाराने सांगितले असताना महापालिकेच्या आकडेवारीत 57 कोटी 78 लाख 48 हजार 249 रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. ही तफावत म्हणजे आर्थिक घोटाळाच असल्याचा आरोपही कामठे यांनी केला आहे.