वाघोली (प्रतिनिधी) – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम आयोजित आणि स्पेस झोन इंडिया मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सॅटॅलाइट लाँच व्हेईकल मिशन २०२३ साठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील प्रॉडिजि पब्लिक स्कूल वाघोली ह्या शाळेतील वैभवी सातपुते, आयुष जाधव, ऋतुजा शेजवळ ह्या तीनही विद्यार्थ्यांची पिको सॅटॅलाइट व रॉकेट बनविण्यासाठी निवड झाली आहे.
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडूतील पट्टीपुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले १५० पिको सॅटेलाइट पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेट च्या साह्याने अवकाशात सोडले जाणार आहेत. यासाठी देशभरातील ५००० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पिको सॅटॅलाइट तयार करण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर देशभरातून स्पर्धेत क्षमता सिद्ध केलेल्या १००मुलांची निवड केली. त्यामध्ये उत्तर भारतातील पहिल्या 40 विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी मेरिट मध्ये आले असून त्यांना 17 फेब्रुवारी ला रॉकेट बनवण्याची संधी मिळाली आहे. ह्या उपक्रमाची नोंद वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड तसेच जागतिक पातळीवरील इतर पाच संस्था घेणार आहेत.
अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक मनिषाताई चौधरी यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक बनविण्यासाठी जिल्हा समन्वयक माधुरी शेजवळ मॅडम शाळा तळेगाव ढमढेरे नं 1 विशेष मार्गदर्शन व प्रयत्न करत आहेत.