मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर दोन संशयित लोक दिसले आहेत. हे संशयित एका टॅक्सी चालकाला अंबानी यांच्या अॅंटिलिया घराचा पत्ता विचारत होते. यानंतर टॅक्सी चालकाने तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवण्यात येत आहे. टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले की, दोन लोक त्याला बॅग घेऊन मुकेश अंबानींचे घर अँटिलियाचा पत्ता विचारत होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी अँटिलियाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदीही करण्यात आली आहे. डीसीपी स्तरावरील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे मुंबईतील 27 मजली अँटिलियामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनने भरलेली कार सापडली होती. त्या वाहनात एक धमकीची चिठ्ठीही सापडली होती, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली होती.
तपासात हे वाहन मनसुख हिरेन नावाच्या व्यावसायिकाचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी आठवडाभरापूर्वीच कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आठवडाभरानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे एपीआय सचिन वाजे याला अटक करण्यात आली. जो अजूनही तुरुंगात आहे. त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. अशातच आज दोन संशयित अॅंटिलीयाबाहेर दिसल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.