मध्य रेल्वेच्या 17 स्थानकांना सुरक्षाकवच

इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आधारित व्हिडिओ देखरेख यंत्रणा

पुणे – सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या उपाययोजना वाढविण्यावर भारतीय रेल्वेतर्फे भर दिला जात आहे. या प्रयत्नांतर्गत मध्य रेल्वे प्रशासनाने 17 स्थानकांवर इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आधारित व्हिडिओ देखरेख यंत्रणा उपलब्ध करून दिली.

या यंत्रणेचे उद्‌घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मुख्यालयातून व्हिडिओ देखरेख प्रणालीचे (व्हिडिओ सर्वेलंस सिस्टिम) उद्‌घाटन केले. याप्रसंगी आयोजित वेबिनारसाठी प्रधान मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्‍त अतुल पाठक, प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता ए. के. श्रीवास्तव, रेलटेलचे प्रादेशिक महाव्यवस्थापक व्ही. के. अग्रवाल याप्रसंगी उपस्थित होते.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आधारित व्हिडिओ देखरेख प्रणाली (व्हीएसएस) स्थापित केली आहे. ही सर्व (उदा. लोणावळा, अमरावती, बुऱ्हानपूर, शेगाव, खंडवा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, बैतूल, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, दौंड, कलबुरागी, कोपरगाव, कुर्डूवाडी आणि साईनगर शिर्डी) “ए’ वर्ग प्रकारात येणारी महत्त्वाची स्थानके आहेत.

मध्य रेल्वेच्या सर्व 17 स्थानकांवरील सीसीटीव्ही ऑप्टिकल फायबर केबलद्वारे रेलटेल एमपीएलएस बॅकबोनवर नेटवर्क केले गेले आहेत. शिवाय, व्हिडिओ फीड्‌स सीएसएमटी स्टेशनच्या एका केंद्रीकृत सुरक्षा नियंत्रण कक्षात आणले गेले आहेत. ज्यामध्ये आरपीएफच्या जवानांद्वारे व्यवस्थापित केलेल्या एकाधिक एलसीडी मॉनिटरवर ते 24 तास पाहिले जाऊ शकतात.

पुणे रेल्वे स्थानकावर सुरुवातीपासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुमारे 60 सीसीटीव्ही बसविले आहेत. याशिवाय, स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत. निर्भया फंड अंतर्गत व्हिडिओ सर्वेलेन्स सिस्टिम बसविण्यात येत आहे. त्यामुळे या फंडद्वारे अन्य स्थानकांनादेखील प्राधान्य देण्यात येत आहे.
– उदयसिंह पवार, विभागीय सुरक्षा आयुक्‍त, पुणे विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.