पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत यूके, यूएसए आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे, तसेच अमेरिका येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. विश्वनाथ कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षण आणि मानवतेसाठी दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी त्यांना ही पदवी २५ एप्रिल २०२४ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
२१ एप्रिल रोजी शिकागो येथे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले, त्या ठिकाणी डॉ. कराड यांनी स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचे मिशन हाती घेतले आहे.
डॉ. कराड यांच्या नेतृत्वात जाणार्या शिष्टमंडळात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संचालक डॉ. महेश थोरवे, विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे व व्यवस्थापनाशास्त्र विभागाचे प्रा. गौतम बापट यांचा समावेश आहे.
डॉ. विश्वनाथ कराड हे १९ एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती या विषयावरील गोलमेज परिषदेत विचार मांडतील, तसेच २८ एप्रिल रोजी जवळपास २० हजार लोकांसमोर डॉ. कराड यांचे संत ज्ञानेश्वर ते डॉ. अल्बर्ट आईन्स्टाइन या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.