आरोग्य सेवेत पुणे झेडपी राज्यात द्वितीय

राज्य शासनाचे सर्वेक्षण : ठाणे जिल्हा परिषद अव्वल

पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यावेळी आरोग्य सेवेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. राज्य शासनाकडून करण्यात अलेल्या सर्वेक्षणात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, माता व बाल संगोपन कार्यक्रम, लसीकरण यासह अन्य आरोग्य सेवांसाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागाला 85 गुण दिले आहेत.

राज्यातील आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने सुरू रहावी, सेवा देताना रुग्णांना तत्काळ आणि उत्तम सेवा मिळावी यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रॅंकिंग काढले जाते. त्यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, नोंदणी, साथीचे आजारांवर आरोग्य विभागाने कशा पद्धतीने नियंत्रण आणले, त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या या सर्व बाबींची पाहणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र गुण देण्यात येते. यामध्ये शंभरपैकी अधिक गुण मिळवणाऱ्या आरोग्य विभागाला क्रमांक दिले जातात. त्यामध्ये यावर्षी द्वितीय क्रमांकावर येण्याचा मान पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळाला आहे. तर प्रथम क्रमांक ठाणे विभागाला मिळाला असून, केवळ 2 गुणांसाठी पुणे जिल्ह्याला पहिला क्रमांक सुटला आहे.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे, लसीकरण यामध्ये उत्तम काम केले आहे. तसेच साथीच्या आजारामध्ये आरोग्य विभागाने चांगले काम केल्यामुळे राज्य शासनाकडून चांगले गुण देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळालेला दुसरा क्रमांक हा अधिकारी, डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे. त्यामध्ये अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. द्वितीय क्रमांक मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली असून, पुढच्यावेळी प्रथक क्रमांक मिळवणार आहोत.
– डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.