प्रदूषणात वाढ होत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या
पुणे – दिवसेंदिवस शहराच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. या वाढत्या प्रदुषणाचा सर्वाधिक फटका वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चौकांमध्ये उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांना बसत आहे. परिणामी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांना “मास्क’ देण्यात येणार आहेत.
वाहतूक नियमनासाठी चौकाचौकांत उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांना तासन्तास उभे राहावे लागते. शहरामध्ये वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस धुराचे लोट वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत देखील वाढ होत आहे.
स्वारगेट, नळस्टॉप, अलका टॉकिज चौक, मालधक्का चौक, डेक्कन, शाहीर अमर शेख चौक, कात्रज आदी मोठ्या चौकांमध्ये होणारे प्रदूषण जास्त आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता झपाट्याने वाढत आहे. नव्या निर्णयानुसार वाहतूक पोलिसांना सहा महिने फिक्स ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलिसांना सहा-सहा महिने एकाच चौकात काम करावे लागणार आहे. वाहतूक पोलिसांची ड्युटीची वेळ, प्रदूषण आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करुन त्यांना “मास्क’ देण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिसांना चांगल्या दर्जाचे “मास्क’ देण्यात येणार आहेत. यानुसार नुकतीच सुमारे दोन हजार “मास्क’ची खरेदी करण्यात आली असून ते वाहतूक विभागांना देण्यात आले आहेत. लवकरच सर्व वाहतूक पोलिसांपर्यंत ते पोहचविण्यात येणार आहेत.
वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी “मास्क’ खरेदी करण्यात आले आहेत. विशेषत: वाढत्या प्रदूषणापासून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच पोलिसांना या “मास्क’चे वाटप करण्यात येणार आहे.
– पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त.