मुंबई – शेअर बाजारावर नोंदलेल्या दोन कंपन्यांच्या शेअरच्या भावाबाबत दिशाभूल करणारी माहिती युट्युब चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केल्याबद्दल अभिनेता अर्शद वारसी याच्यासह इतर 45 जणांवर शेअर बाजार नियंत्रक सेबीने बंदी घातली आहे.
यामध्ये हर्षद वारसी याची पत्नी मारिया गोरेटी यांचा समावेश आहे.
साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाईन ब्रॉडकास्ट या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करणे फायदेशीर आहे असे वारसी आणि इतरांनी युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सांगितले होते. या माध्यमातून शेअरच्या किमती फुगवून या लोकांनी 54 कोटी रुपयाचा फायदा मिळविल्याचे सेबीच्या निदर्शनास आले आहे. याचा वारसीला 29 लाख रुपयांचा फायदा झाला तर त्याच्या पत्नीला 37 लाख रुपयाचा फायदा झाल्याचे दिसून आले.
या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर सेबीने याची चौकशी केली आणि चौकशीनंतर हा निर्णय जाहीर केला. या व्हिडिओमध्ये दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली असे तक्रार दाखल करणाऱ्याचे म्हणणे आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2022 मध्ये युट्युबवर ही माहिती प्रसारित झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्याचे आढळून आले.
शेअरच्या भावात वाढ झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याचे मूल्यांकन करण्यात आले. शेअरच्या किमती वाढल्यानंतर या दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आपले शेअर बाजारात विकून मोठा नफा कमवला. या दोन कंपन्यापैकी एक कंपनी आदानी समूह खरेदी करणार आहे अशी चुकीची माहिती देण्यात आली. एका व्हिडिओमध्ये या कंपनीमध्ये अमेरिकेच्या काही कंपन्या गुंतवणूक करणार आहेत आणि चित्रपट निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.