- शाळाबाह्य बालकांचा शोध
पुणे – पुणे महापालिका हद्दीत शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांनी 3 लाख 5 हजार 898 कुटुंबाचे सर्वेक्षण केले. यात हडपसर क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक 30 हजार 637 कुटुंबाचा समावेश आहे. शाळाबाह्य मुलांसाठी कृतियोजनाही राबविण्यात येणार असून त्याचे वेळापत्रकही निश्चित केले आहे.
करोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासन, शाळा, शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणासाठी व मुले शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्न करीतच असून अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे व त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
रोजगाराची अनिश्तिता, सामाजिक सुरक्षितता, पालकांच्या मनातील भीती, वाढणारी बालमजूरी, बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत 100 टक्के मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या सर्व हक्काची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळांनी एकत्रित येऊन शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीम राबविली.
विभागीय पर्यवेक्षक, विषय तज्ज्ञ, मोबाइल टीचर यांनी सर्वेक्षणाच्या नियोजनात सहभाग घेतला. महत्त्वाच्या ठिकाणच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांच्या नोंदी केल्या. सर्वेक्षणात आढळून आलेल्या शाळाबाह्य, स्थलांतरित बालकांची नागरी समूह साधन केंद्र निहाय विभागणी करण्यात येणार आहे. 15 व 16 मार्च रोजी शाळाबाह्य विद्यार्थी ज्या शाळेच्या परिसरात राहतात, त्या शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शाळांना संबंधती विद्यार्थ्यांची गृहभेट करून शाळेत दाखल करून घेण्यास सांगण्यात येणार आहे.
18 मार्च रोजी शाळेने संबंधीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. 17 ते 20 मार्चदरम्यान दिव्यांग बालकांच्या घरी समक्ष भेट देऊन शाळाप्रवेश करणे व त्यास आवश्यक मदत करण्यात येणार आहे. 17 ते 25 मार्च या कालावधीत शाळेत दाखल होण्यास इच्छुक होण्यास नकार देणाऱ्या बालकांच्या पालकांचे स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येणार आहे.
क्षेत्रिय कार्यालयनिहाय सर्वेक्षण झालेली कुटुंब संख्या
नगररोड 21,682, घोलेरोड 12,285, कोंढवा-येवलेवाडी 16,983, धनकवडी-सहकारनगर 22,391, कोथरुड 18,191, सिंहगड रोड 6,841, भवानीपेठ 21,755, विश्रामबाग वाडा 30,332, येरवडा 30,462, औंध 21,164, वारजे 20,676, ढोलेपाटील रोड 13,568, हडपसर 30,637, बिबवेवाडी 22,024, वानवडी 16,907 अशा एकूण 3,05,898 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.