उत्तरा कन्नड (कर्नाटक) – कॉंग्रेस पक्षाने कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे अशी माहिती कर्नाटकचे कायदा आणि विधीमंडळ कार्यमंत्री एच.के. पाटील यांनी दिली आहे.
उमेदवार कोण योग्य आहेत हे पाहण्यासाठी उमेदवारांची लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी अभ्यासली जात आहे.या बाबत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन प्रदेश कॉंग्रेस समितीला अहवाल सादर केला जाईल असे पाटील यांनी सांगितले.
उत्तरा कन्नड येथे पत्रकार परिषदेत बोलताना एच. के. पाटील म्हणाले, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार उमेदवारांचा अभ्यास करून अहवाल देतील. शिवकुमार यांनी संबंधीतांना विविध मतदार संघांची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार आपण विविध भागात जाऊन बैठका घेत आहोत असे ते म्हणाले. मी यापूर्वीही अंकोला येथे बैठक घेतली अनेक नेते आणि कार्यकर्त्यांशी उमेदवारांबाबत चर्चा केली.
कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फक्त एक लोकसभा जागा जिंकली होती. त्यात डीके सुरेश यांनी बेंगळुरू ग्रामीणमधून विजय नोंदवला आणि आता राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने या वेळी पक्षाच्या खासदारांच्या संख्येत कमालीचीवाढ होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.