धान्य, फळे आणि भाजीपाल्याची शेती करून अनेक शेतकरी यशस्वी झाल्याच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही ऐकल्या असतील. परंतु पृथ्वीच्या पाठीवर असाही एक कलंदर आहे की, जो विंचवाचे विष विकून श्रीमंत बनला आहे. इजिप्तमधील काहिरा येथे राहणारा मोहम्मद हम्दी बोष्टा हा 25 वर्षाँचा युवक नम नावाच्या कंपनीचा मालक आहे. हम्दी इतक्या महागड्या किंमतीने विष विकतो की ते पाहून कुणालाही विंचू डसल्याचा अनुभव यावा.
जगावेगळा छंद असलेला हम्दी पुरातत्व विषयातील पदवीचे शिक्षण घेत आहे. परंतु इजिप्तमधील मोठ्या वाळवंटात आणि किनाऱ्यांवर जाऊन विंचवाची शिकार करण्याचा त्याला छंद आहे. त्यामुळे त्याने शिक्षण बाजूला ठेवून आपल्या आवडीचे काम करणे सुरु केले आणि आज तो इजिप्तमधील विषाचा सर्वात मोठा व्यापारी आहे.
त्याने विविध जातींचे तब्बल 80,000 पेक्षा जास्त विंचू आणि साप पाळले आहेत. त्याचे विष काढून तो औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना पुरवतो. विंचवाचे विष काढण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या सहाय्याने विंचवाला हलकासा वीजेचे झटका दिला जातो. झटका लागताच विंचू विष बाहेर फेकतो. ते साठवून ठेवले जाते. रॉयटर या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार विंचवाच्या एक ग्रॅम विषापासून 20 ते 50 हजार विषविरोधी डोस बनवले जातात.
हम्दी बोष्टा विंचवाचे विष युरोप आणि अमेरिकेत पाठवतो. तेथील औषध उत्पादन कंपन्या या विषाचा वापर विषविरोधी डोस आणि उच्च रक्तदाबासारख्या व्याधींवर औषधांचे उत्पादन केले जाते. विंचवाचे एक ग्रॅम विष विकल्यावर त्याला दहा हजार अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे 7 लाख रुपये मिळतात.