– डॉ. मेघश्री दळवी
आजच्या मानवाचा पूर्वज म्हणजे साडेचार लाख वर्षांपूर्वीच्या युरेशियन निअँडरथल मानवापासून विकसित होत गेलेला युरोपीय निअँडरथल. प्लाइस्टोसीन कालखंड साधारण बारा हजार वर्षांपूर्वी संपला आणि तोपर्यंत उत्क्रांत होत गेलेला मानव म्हणजे आपण होमोसेपियन्स असा एक सर्वमान्य आलेख आहे.
मात्र, या सिद्धांताला छेद देणारा एक अतिशय महत्त्वपूर्ण पुरावा आता हाती लागला आहे. सुमारे सव्वालाख वर्षांपूर्वी, प्लाइस्टोसीन कालखंडाच्या मध्यावर एक वेगळाच मानव मध्यपूर्वेच्या प्रदेशात वास्तव्य करून होता. त्याच्या जबड्याची आणि दातांची ठेवण निअँडरथलसारखी होती.
पण त्याच वेळी त्याच्या कवटीचा आकार मात्र सुरुवातीच्या होमोसेपियन्स मानवाशी अतिशय मिळताजुळता होता. याचा अर्थ हा मानव निअँडरथल आणि होमोसेपियन्स मधला दुवा असावा.
तेल अविव युनिव्हर्सिटी आणि हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरूसलेम यामधलं हे संशोधन अलीकडेच अत्यंत प्रतिष्ठित अशा सायन्स या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
नेशर रामला ही जागा इस्रायलच्या राजधानी तेल अविवच्या जवळ आहे. तिथे एका सिमेंट प्लांटसाठी खोदकाम करत असताना आठ मीटर खोलीवर प्राण्यांची हाडं, काही दगडी हत्यारं आणि एक मानवी कवटीचा काही भाग मिळाला.
सोबतच्या जीवाश्मांवरून अभ्यास करून या संशोधकांनी त्याची तुलना युरोप, आशिया आणि आफ्रिकेतल्या त्याच कालखंडातल्या जीवाश्मांबरोबर केली. सगळ्या विश्लेषणानंतर या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यावरून या मानवाला नेशर रामला होमो हे नाव देण्यात आलं आहे.
निअँडरथल सुमारे चाळीस हजार वर्षांपर्यंत अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. म्हणजे एकाच वेळी निअँडरथलबरोबर हा मानवही जगत होता, काही वेळा त्यांच्यात संकर होत होता, असा नवा सिद्धान्त आता संशोधकांनी मांडला आहे. उत्खननाच्या जागी मिळालेली हत्यारे ही सहसा होमोसेपियन्स वापरतात त्या प्रकारची असल्याने हे म्हणणं पटण्यासारखं आहे.
माणसाची उत्क्रांती ही वाटते तितकी सरधोपट गोष्ट नसून ती अतिशय गुंतागुंतीची आहे. एकाच वेळी दोन-तीन प्रकारची माणसं टोळ्या करून राहात होती, त्यांच्यात साम्य होतं, तसा फरकही होता. पण त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत होता, असं आता निश्चितपणे मानलं जात आहे.
निअँडरथल स्थलांतर करत युरोपात आले, त्यातून युरोपीय निअँडरथल आणि होमोसेपियन्स हे त्यांचे वंशज अशी एक मीमांसा होती. पण निअँडरथलऐवजी नेशर रामला होमो युरोपात आले असतील, हा सिद्धान्त पुढे येत आहे.
याचदरम्यान, चीनमध्ये होमोलॉन्गी किंवा ड्रॅगन मानव संचार करत होता, असा एक ताजा शोध आहे. मध्यपूर्वेत नेशर रामला होमो वावरत असताना पूर्व आशियात होमोलॉन्गी राहात होता का, सगळ्यांच्या वंशजांमध्ये सरमिसळ झाली असेल का, या कोड्याच्या निमित्ताने माणसाच्या उत्क्रांतीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.