विज्ञानविश्‍व : हायाबुसा परतला

मेघश्री दळवी

सुमारे दोन वर्षांपूर्वी, 21 फेब्रुवारी 2019 रोजी जपानच्या हायाबुसा-2 यानाने ऱ्यूगू या अशनीचा पहिला नमुना घेतला. आपल्यापासून कोट्यवधी किमी अंतरावर असलेली ही अशनी एक किलोमीटरहूनही कमी लांबीची आहे. चार वर्षांचा अंतराळप्रवास करून हायाबुसा यान या छोट्याशा अशनीवर अचूकपणे उतवरणं ही खरोखरच अशक्‍यप्राय वाटणारी गोष्ट. पण आज आपलं अंतराळ तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की हायाबुसा तिथे केवळ उतरलाच नाही तर त्याने तिथे उतरून ड्रिल करून या खडकाळ अशनीचे नमुने गोळा केले. पुढे हे नमुने योग्य प्रकारे साठवून दोन वर्षांच्या परतीच्या प्रवासात सुरक्षितपणे जपून ठेवले. आणि मागच्या महिन्यात, 5 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर यशस्वीपणे परत आणले. ही अफाट किमया तंत्रज्ञानाची.

हायाबुसाने आणलेले सुमारे साडेपाच ग्रॅम वजनाचे ऱ्यूगूचे नमुने अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. ऱ्यूगूमध्ये बर्फ आणि कार्बनी संयुगं आहेत. अशनींवर वातावरण नसल्याने त्यांचे खडक कोट्यवधी वर्षे आहेत त्याच स्थितीत राहू शकतात. त्यांची झीज होत नाही की ऑक्‍सिडीकरण होत नाही. त्यामुळे ऱ्यूगूच्या नमुन्यांवरून विश्‍वाची निर्मिती कशी झाली,आपल्या सूर्यमालेचा आरंभ आणि विकास कसा झाला, अंतराळात पाणी वेगवेगळ्या स्वरूपात कसं मिळू शकतं, सजीवांचा उगम कुठे आणि कसा घडला असेल, अवकाशात सजीव तग धरू शकतात का, अशा प्रश्‍नांची उत्तरं मिळण्याची आशा आहे.

हायाबुसाची नमुना घेऊन आलेली कॅप्सूल ऑस्ट्रेलियामध्ये उतरली. ती तिथून जपानमध्ये नेण्यात आली. आता जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेत या नमुन्यांवर अभ्यास सुरू झाला आहे. या कॅप्सूलमध्ये तीन विभाग होते. त्यातल्या अ विभागात ऱ्यूगूच्या अंतर्भागातले वायुरूप नमुने ठेवले होते. या अवाढव्य अंतराळातला वायू स्थितीतला नमूना आपल्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ. या अभूतपूर्व नमुन्याचं प्राथमिक विश्‍लेषण करून त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात का, हे आता पाहायचं. या वायुरूप नमुन्यांची रेणूंच्या पातळीवर संरचना कशी आहे, आणि त्यात समस्थानिकं मिळतात का, याकडेही शास्त्रज्ञांचं लक्ष आहे.

कॅप्सूलच्या ब विभागात ऱ्यूगूच्या पृष्ठभागावरील धुळीचे नमुने आहेत, तर ड्रिल करून घेतलेले खडकांचे नमुने क विभागात आहेत. हे सर्व नमुने जपानी मोहिमेतून मिळाले असले तरी नासा आणि इतर देशांमधल्या अंतराळ संशोधन संस्थांनाही त्याचे काही भाग अभ्यासासाठी सोपवले जाणार आहेत.
गेल्या वर्षी ऑक्‍टोबर 2020 मध्ये नासाच्या ओसिरिस-रेक्‍स यानाने बेनू या अशनीवर उतरून तिथले नमुने घेतले. हे यान सप्टेंबर 2023 मध्ये पृथ्वीवर परतणार आहे. त्यातून आणखी नवा मौलिक डेटा मिळण्याची अपेक्षा आहे. बेनूच्या नमुन्यांवर काम करणारी टीम ऱ्यूगूच्या नमुन्यांचाही अभ्यास करणार आहे. दोन वेगवगळ्या अशनींच्या तुलनात्मक संशोधनाने विश्‍वाच्या निर्मितीबाबत काही निष्कर्ष काढण्याची ही अत्यंत दुर्मिळ संधी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.