अमृतकण : आपलेपणा जपताना

अरुण गोखले

माणसांनी जीवनात एकमेकांशी आपलेपणा जागवत आणि तो टिकवत जगावं लागतं. त्यांनी तसे करावे हे अभिप्रेत असते. त्यामुळेच मुलीचे कन्यादान करून आपली ती आपलेपणाने जपलेली ठेव ही सासरच्या माणसांच्या हाती सुपूर्त करताना प्रत्येक मुलीचे आई-वडील हे त्या सासरच्या लोकांना हेच सांगत अन्‌ विनवीत असतात की, “आमची पोर तुमच्या घरात देत आहोत. तिचा आपलेपणाने सांभाळ करा.’

लग्न समारंभातला एक विशेष विधी म्हणून सासरची माणसं डोक्‍यावर झाल घेताना निदान कार्यालयात तरी तशी “हो’ म्हणून कबुली देतात. पण पुढे प्रत्यक्षात मात्र सासरा हे सुनेचे वडील, सासू ही आई तर नणंदा-दीर हे भाऊ-बहिणीसारखे वागतात का? हा खरोखरच विचार करण्याचा प्रश्‍न आहे. त्या शब्दाचा तेवढा सन्मान हा वास्तवात राखला जात नाही.

आपल्या लेकीला तिच्या सासरच्यांनी त्यांची लेक म्हणून मानावी. तिला आपलेपणाने वागवावे. तिची प्रेमाने जपणूक आणि सांभाळ करावा हे आपणास अपेक्षित असते. पण तेच दुसऱ्याची लेक आपल्या घरी आल्यावर आपण तिला खरोखरच आपल्यात सामावून घेतो का? “बाई गं, कालपर्यंत हे घर माझं होत. आता ते आपल्या दोघींच आहे. ते आपण आपलेपणाने सांभाळू या’ असे किती सासवा आपल्या सुनेस सांगतात?

काय गंमत आहे पाहा. आम्ही जावयाला चटकन मुलासारखा मानतो. त्याचं मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेतो. आस्थेने प्रेमाने त्याचं हवं नको बघतो. मग हाच आपलेपणा, हेच प्रेम, हीच आस्था सुनेच्या बाबतीत दाखवली जाते का? हा आपलेपणा दाखवायचा, टिकवायचा तर इथे कुठेतरी आम्ही आमचा हेका, हट्ट, आग्रहीवृती, सत्ता, अधिकार, हा निदान काही प्रमाणात तरी सोडण्याइतका मनाचा मोठेपणा दाखवायला लागतो.

स्वत: बरोबरच दुसऱ्याच्या मनाचा विचार करणे. त्यास समजून घेणे, काही गोष्टी ह्या तुम्ही मोठेपणाने नव्या पिढीकडून सांगून करून घ्याव्या लागतात. जबाबदारी पेलण्याची त्यांची क्षमता वाढवून मग काही अधिकार आणि हक्‍क हे त्यांना द्यावेच लागतात.

हे आपलेपणाचे भान जसे घरात तसेच ते शेजारीपाजाऱ्यांशीही राखावे लागते. तरच ते अडीअडचणीवेळी मदतीस धावून येतात. कामाच्या जागी, कार्यक्षेत्रात, कार्यालयात आपल्या सहकर्मचाऱ्यासोबत, हाताखालच्या लोकांबद्दलही हे आपलेपणाचे भान राखणे हेच आपल्या फायद्याचे असते. मान दिला की मान मिळतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.