विज्ञानविश्‍व : विषाणू फस्त करणारे जीव

मेघश्री दळवी

करोनाचा सामना करता करता आपण खूप काही नवीन शिकतो आहोत. या विषाणूंचं आकारमान, त्यांची रचना, त्यांना दूर ठेवण्यासाठीचे उपाय, आणि त्यांना नष्ट करण्याचे मार्ग. नेमक्‍या याच वेळी एका संशोधनाने एक आशेचा किरण दाखवला आहे, तो म्हणजे विषाणू फस्त करणारे जीव. एकपेशीय जीवांच्या जीन्सचा अभ्यास करणाऱ्या बिग्लो लॅबोरेटरी फॉर ओशन सायन्सेस या संशोधन संस्थेने अलीकडे ही माहिती जाहीर केली आहे.

समुद्रात अनेक सूक्ष्मजीव आणि एकपेशीय आद्यजीव आढळतात. त्यातले दोन एकपेशीय जीव विषाणू भक्षण करताना आढळले आहेत. त्यांच्यामध्ये कित्येक निरुपद्रवी विषाणूंचे डीएनए मिळाले आहेत आणि त्यावरून असा निष्कर्ष काढता येईल असा दावा या संस्थेतल्या डॉ. स्टेपनॉस्कस यांनी केला आहे. अमेरिकेतील मेन राज्यात आढळणारे हे जीव विषाणू भक्षण करून त्यांच्यातल्या पोषक द्रव्यांचा फायदा करून घेतात, असं डॉ. स्टेपनॉस्कस यांचं निरीक्षण आहे.

याच संस्थेतल्या दुसऱ्या संशोधक डॉ. ज्युलिया ब्राऊन यांच्या मते विषाणूंमध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजन भरपूर असतं. त्यामुळे हे एकपेशीय जीव आपल्या कार्बन आधारित अन्नासोबत विषाणूंकडून ही आवश्‍यक पोषक द्रव्यं मिळवत असावेत. या निमित्ताने विषाणूंची संख्या मर्यादेत राहत असेल, हीही एक शक्‍यता आहे. उपद्रवी विषाणूंच्या संसर्गाने एकूणच सूक्ष्मजीवांची संख्या नियंत्रण केली जाते. निरूपद्रवी विषाणूंची भूमिका मात्र नेमकी काय असेल या प्रश्‍नाला एका परीने आता उत्तर मिळालं आहे.

फ्रंटीअर्स इन मायक्रोबायोलॉजी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. समुद्रातले एकपेशीय जीव हे पिको, नॅनो, मायक्रो असे वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि त्यांचा अभ्यास अत्यंत गुंतागुंतीचा असतो. या संशोधनात आता नवनवीन तंत्रांचा वापर होतो आहे. त्यातूनच विषाणूंचे डीएनए निश्‍चित करण्यात बिग्लो लॅबोरेटरीतल्या संशोधकांना यश मिळालं.

जीवांमध्ये विषाणूंचे डीएनए मिळण्यामागे इतर काही कारण असेल का, याचा या चमूने खूप अभ्यास केला. पण दर वेळी एकच समाधानकारक उत्तर मिळत होतं, हे जीव विषाणू फस्त करतात आणि त्यामुळेच विषाणूंच्या डीएनएचे काही भाग या एकपेशीय जीवांमध्ये आढळतात. आता हे जीव विषाणूंचे डीएनए पुढच्या पिढीत पाठवतात का, किंवा त्यांच्या आधारे संसर्गापासून स्वत:चं संरक्षण करतात का, अशा पुढील संशोधनावर आता ते भर देणार आहेत.

निसर्ग अन्नसाखळी निर्माण करत असतो आणि त्या साखळीतल्या प्रत्येक दुव्याला नियंत्रणात ठेवत असतो, असं म्हणतात. या जीवांचा शोध हे बहुधा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आज ना उद्या आपण अशा आणखी सूक्ष्मजीवांचा शोध घेऊ शकू आणि मानवजातीवर असलेलं विषाणूंचं सावट दूर करण्यासाठी त्यांचा वापर करू शकू अशी एक आशा या संशोधनातून निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.