प्रासंगिक : सणउत्सव आणि देशीवस्तू

रितु कुमार, फॅशन डिझायनर

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी चीनमधून होत असलेल्या आयातीवर तत्काळ निर्बंध घालायला हवेत. असे केल्यास आधीच संकटात असलेल्या आपल्या कारागिरांच्या हितांचे रक्षण होऊ शकेल.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये मी पॅरिसमध्ये गेले होते. आम्ही ऍव्हेन्यू मेन्टेन्यू गल्लीतून निघालो होतो. एफेल टॉवर आणि चॅम्प एलिसिस यांना जोडणारा हा रस्ता आहे. फॅशनच्या दुनियेतील हा सर्वांत ग्लॅमरस रस्ता आहे. युरोपातील हाउते कॉउचर (या डिझाइनमध्ये मशीनच्या साह्याने शिलाई केली जात नाही) डिझाइनर लोकांचे हे माहेरघर मानले जाते. सध्या अर्थव्यवस्था अत्यंत कठीण काळातून जातेय.

धनाढ्य ग्राहकांची संख्या रस्त्यावर मर्यादित होती यावरून ते जाणवत होते. चिनी लोक आता फॅशनच्या दुनियेत आपले स्थान घट्ट करू पाहत होते. कारण आता ते जगातील सर्व लक्‍झरी कपडे आणि अन्य वस्तूंची निर्मिती आणि पुरवठा करीत होते. परंतु करोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलू लागली आहे आणि चिनी वस्तू बाजारातून गायब होऊ लागल्या आहेत.

अर्थात, भारतीय बाजारपेठेवर चीनची नजर कायम आहे आणि चीन अगदी कमी किमतीत लोकप्रिय भारतीय शिल्पांच्या प्रतिकृती विकू पाहत आहे. चिनी मंडळी जेव्हा बाजारात उतरतात तेव्हा ती किमतीची चिंता करत नाहीत. त्यांच्या उत्पादनांच्या किमती त्यांच्या राजकीय धोरणाद्वारे निश्‍चित केल्या जातात.

भारतीय ग्राहकांची पसंती, त्यांच्या सवयी आणि किमतीविषयीच्या अपेक्षा यांचा अभ्यास करून आपली उत्पादने लवकरात लवकर बाजारपेठेत रुजविण्यात चिनी लोक वाक्‌बगार आहेत. दुर्दैवाने भारतीय हस्तशिल्पांच्या बाबतीत चीन मशीनच्या साह्याने उत्पादन करू इच्छित आहे. येथील शिल्पांची नक्‍कल ती मंडळी मशीनच्या साह्याने करतात.

आपल्याकडे भारतात मात्र आजही 1.6 कोटी शिल्पकार रोजच्या रोज हाताने शिल्प घडवितात. अर्थातच, चीनला अशा प्रकारे बाजारात नकली शिल्पे आणण्याची अनुमती देणे चुकीचे आहे. मुळातच कोविड-19 च्या साथीमुळे भारतीय शिल्पकारांनी रोजगार गमावला आहे. परंतु भारतीय बाजारपेठा चीनने निर्मिती केलेल्या नकली वस्तूंनी खच्चून भरलेल्या आहेत. स्वस्त कच्चा माल वापरून या वस्तू बनविल्या जात आहेत.

या बनावट वस्तूंच्या यादीत आता तर अनेक आश्‍चर्यकारक उत्पादने आली आहेत. उदाहरणार्थ, बनारसी आणि चंदेरी साड्या, सिंथेटिकवर छापण्यात येत असलेली राजस्थानी बंधेज कलाकुसर, गुजरात आणि कच्छमधील आरशांचे कशिदाकाम, कांथा, सुजनी, फुलकारी आणि लखनवी कशिदाकाम इत्यादी बाबी चीनकडून सिंथेटिक कापडावर मशीनच्या साह्याने केल्या जात आहेत. बंजारा बॅग आणि कोल्हापुरी चप्पलसुद्धा आता जिंझियांग येथून आयात केल्या जात आहेत.

मंगोलियन लोकरीने तयार केलेली नकली काश्‍मिरी शाल तयार करून पश्‍मिनाचा टॅग लावला जात आहे. चीनमधून आयात केल्या जात असलेल्या वस्तूंमध्ये एकही वस्तू अशी नाही, जी येथील छोट्या-मोठ्या बाजारांत उपलब्ध नाही. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी यातून थोडीफार मदत झाली आहे, ही गोष्ट खरी; परंतु लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, त्या मोबदल्यात येथील शिल्पकला क्षेत्रातील कुशल कारागीरांचे काम हिरावून घेतले जात आहे.

फॅशनच्या क्षेत्रातील आपली ओळख न बदलणारा; उलट तिचे रक्षण करणारा भारत हा एकमेव देश आहे. पारंपरिक तिमिर चित्र, शिल्प आणि कापडनिर्मिती प्रक्रियेवर आधारित असलेल्या या फॅशनला नवे रूप दिले आहे. तसे पाहायला गेल्यास हीच खरी “मेक इन इंडिया’ उत्पादने आहेत. या कलाकृती नसून चमत्कृती आहेत आणि आपण त्यांची तुलना चीन आणि मेक्‍सिकोतून आलेल्या वस्तूंशी कशी करतो, हेच खरे तर कोडे आहे. त्या देशांमध्ये ऑरगॅनिक कपडे आता केवळ वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात आणि ते देश पॅरिसच्या रॅम्पचीही आता नक्‍कल करू लागले आहेत.

मी ज्या-ज्या लोकांशी बोलले त्यांतील अनेकांनी आश्‍चर्यचकित करणारा भारतीय बाजारपेठेतील कल सांगितला. भारतात उत्सव आणि सणांच्या काळात स्थानिक बाजारपेठेत चीनची घुसखोरी वाढते, अशी माहिती अनेकांनी दिली. तेथून येणाऱ्या झालरी रंगीबेरंगी असतील खऱ्या; परंतु त्या तयार करणे हे काही रॉकेट विज्ञान नाही आणि त्या वस्तू सहजरीत्या येथे तयार केल्या जाऊ शकतात. परंतु आपल्याकडे दिवाळीचे दिवेच नव्हे तर गणेश, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्ती, राधा-कृष्णाच्या मूर्तीसुद्धा चीनमधून आयात होत आहेत. याचाच अर्थ आपण आपल्या धार्मिक प्राधान्यक्रमांबाबतही संवेदनशील नाही. अशा वस्तूंच्या आयातीची समीक्षा केली जायला हवी.

अशा मूर्ती आपल्याकडे पावित्र्य जपून तयार केल्या जातात. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकाराच्या हाताचे ते कौशल्य असते. तसे पाहायला गेल्यास आपल्याकडे पूजेसाठी वापरावयाच्या वस्तू मातीच्या असाव्यात, ही प्राचीन परंपरा आहे. एवढेच नव्हे तर मातीच्या वस्तू नैसर्गिकरीत्या नष्टही होत असल्यामुळे त्यांचे पुनर्निर्माणही शक्‍य असते. त्यामुळेच आपण धार्मिक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लावून आपल्याकडील कुंभार, मूर्तीकारांच्या हिताचे रक्षण करायला हवे. कारण अशा आयात वस्तूंवर प्लास्टिकचे आवरण असते आणि पूजेनंतर जेव्हा या मूर्तींचे विसर्जन केले जाते, तेव्हा नद्यांचे प्रदूषण होते. कोविड-19 च्या फैलावामुळे यंदा कुंभार व्यवसायाला तसेही खूप कमी काम मिळाले आहे. अशा स्थितीत दिवाळीशी संबंधित वस्तू चीनमधून आयात करण्यात कोणतेही शहाणपण नाही.

आपण “आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला ज्या वस्तूंची आयात करणे गरजेचे नाही, अशा वस्तू कोणत्या आहेत, याची समीक्षा करायला हवी. पहिल्यापासूनच तणावाखाली असलेल्या शिल्प क्षेत्राचे संरक्षण आपण करायला हवे. शिंजियांग आणि शिआमेन येथील उत्पादनांशी स्पर्धा करणे योग्य नाही. कारण तिथे मशीनच्या साह्याने या वस्तूंची निर्मिती केली जाते. ही यंत्रेही डिजिटल असतात. कोणत्याही शिल्पाची नक्‍कल हुबेहूब केली जाते. त्यामुळे आयात केलेल्या वस्तूंऐवजी देशीवस्तू वापरणे योग्य ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.