नवरात्र विशेष : उपासना रात्रीच का?

अरुण गोखले

ती आदिशक्‍ती जशी विश्‍वात अनेक रूपे घेऊन कार्य करते. त्याप्रमाणेच ती मानवी देहातही विविधरूपाने कार्य करीत असते. मानवी देहातील चितीशक्‍ती ही अतिशय तरल आणि चंचल आहे. या शक्‍तीची काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर ही बालके आहेत. मानवी देहातील दुसरी शक्‍ती ही विलासिनी तिची दया, क्षमा, शांती, धन, ज्ञान आणि समाधी ही बालके आहेत.

चितीशक्‍तीची एक बहीण आहे, तिचे नाव वासना. ही वासना मावशी चितीशक्‍तीच्या मुलांना हाताशी धरून मानवी जीवनात मोठा खेळ सतत खेळत असते. त्यामुळेच मानवी जीवन हे मोह, माया आणि ममतेत अडकते. ही मोह, मायाच त्याला खऱ्या मातेच्या भेटीपासून दूर ठेवत असते. आईने खाऊ देऊन मुलांना खेळवत ठेवावे आणि आपल्यापासून दूर ठेवावे तशीच ही वासना मावशी या मुलांच्या मदतीने साधक, उपासक भक्‍तास त्याच्या मातेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. वासना शक्‍तीचा भाऊ दंभ किंवा अहंकार हा देहाला दुबळा बनवीत असतो.

मानवी मनाला या वासना आणि दंभापासून दूर करण्याची शक्‍ती सामर्थ्य हे केवळ सद्‌गुरूंकडेच असते. ते आपल्या कृपेने भक्‍तांच्या मनातला विवेक जागा करतात, त्याला विवेकाने, विचाराने, कृती करायला शिकवितात. विवेकाच्या साबणाने मानवी मनातली विषय वासनेची मलिनता दूर होते.

मनुष्य देहातली विलासिनी शक्‍ती आणि तिच्या दया, क्षमा, शांती, धन, ज्ञान आणि समाधी ह्या सहा बालकांचा विकास करण्याच्या कामी नवरात्र उपासनेतील देवाच्या घटा समोर बसून केलेली उपासना फार उपयुक्‍त ठरते.

आपण टीव्ही पाहण्यासाठी त्याच्यासमोर बसतो. होय ना? तसेच घटावर त्या देवीचे आणि आपल्या देहात विलासिनीच्या बालकांची वृद्धी होण्यासाठी घटासमोर बसायचे असते. आता ते रात्रीच का बसायचे? तर मानवी मन आणि चंद्र ह्यांचा फार जवळचा संबंध आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो, तशी ही उपासना आपण घटासमोर बसून वाढवत न्यायची असते.

घटासमोर बसून नवार्णव मंत्राचा जप केला, तर त्या समोरच्या घटामधून शक्‍ती देवतेची, सिद्धांची, सद्‌गुरू ह्यांची कृपास्पंदने आपल्याला मिळतात. त्या कृपा प्रसादाने आपल्या मनातील अस्थिरता, चंचलता दूर होऊन चित्त प्रसन्न होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.