डॉ. मेघश्री दळवी
रुबिक्स क्यूब तुम्ही पाहिला असेल, तो अचूक जुळवण्याची धडपडदेखील केली असेल. या खेळाच्या स्पर्धा अजूनही जगभर होत असतात. नेहमीचा तीन-तीन छोटे क्यूब असलेल्या बाजूचा रुबिक्स क्यूब सोडवणारा या वर्षीचा चॅम्पियन आहे जर्मनीचा फिलीप वेयर आणि त्याने केवळ 5.97 सेकंदांत हा क्यूब सोडवला आहे. अर्थात, यासाठी त्याने दोन्ही हात वापरले आहेत, आपण वापरतो तसे.
पण खरी गंमत पुढेच आहे. अगदी अलीकडे एका रोबोटने केवळ एक हात वापरून हा रुबिक क्यूब सोडवला आहे. आहे ना कमाल? घट्ट पकड असलेला एक पंजा, त्यातल्या लवचिक बोटांची अचूक हालचाल आणि साथीला कृत्रिम बुद्धिमत्ता, या जोरावर या रोबोटने ही करामत करून दाखवली आहे. यासाठीची कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली अर्थात लिहिली आहे माणसांनीच, आणि तिच्या सहाय्याने अचूक हालचाल करणारे घटकही बनवले आहेत माणसानेच. फक्त पाहताना आपल्याला दिसतो तो चपळ पंजा आणि कमीत कमी पायऱ्यांमध्ये त्याने सोडवलेला रुबिक्स क्यूब.
याधीही असे खूप प्रयोग झाले आहेत. पण त्यात रोबोटने दोन पंजांचा वापर केला होता. ओपन-एआय या कंपनीने 2017 मध्ये एक असा रोबोट तयार केला होता. त्याच कंपनीने आता हा नवा, एकहाती रोबोट आपल्यासमोर सादर केला आहे. चॅम्पियन पातळीवरचे स्पर्धक 50 ते 70 पायऱ्यांमध्ये हा क्यूब सोडवतात. पण या अजब रोबोटने त्यासाठी फक्त 20 पायऱ्या वापरल्या आहेत. अफाट स्मृतीक्षमता आणि पायऱ्यांचं विश्लेषण करण्याची अचाट क्षमता यामुळे हा रोबोट सरस ठरला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली अनुभवातून शिकत जात असते. जितके जास्त प्रयत्न, जितका जास्त सराव, तितकी या प्रणालीची अचूकता वाढत जाते. उलटसुलट केलेला क्यूब पाहायचा, त्याच्या पॅटर्नचा अभ्यास करायचा, त्यातून शक्य त्या पायऱ्यांचा विचार करायचा, त्यांच्यावरून क्यूब सोडवण्याच्या मार्गांचा अदमास घ्यायचा, त्यापैकी कुठचा मार्ग अधिक अचूक आणि कमीत कमी पायऱ्यांमध्ये क्यूब सोडवू शकेल याचं गणित करायचं, आणि मग त्यानुसार तो सोडवून दाखवायचा अशी ही प्रणाली काम करते. एखादी पायरी चुकली किंवा शेवट अपेक्षित असा झाला नाही, तर या चुकांमधून ही प्रणाली शिकत जाते.
गंमत म्हणून या रोबोटला क्यूब सोडवताना अनेक प्रकारे विचलित करूनदेखील पाहण्यात आलं. कधी त्याला एखाद्या खेळण्याने ढोसून बघ, तर कधी क्यूबवर ब्लॅंकेटच टाकून ठेव, अशा टवाळक्या संशोधकांनी करून बघितल्या. पण त्यांना दाद न देता हा रोबोट आपलं नेमून दिलेलं काम मुकाट करत राहिला. यूट्यूबवर या रोबोटचं प्रात्यक्षिक पाहताना खरोखरच भान हरपून जातं. रुबिक्स क्यूब सोडवणे म्हणजे या रोबोटसाठी अगदी डाव्या हाताचा खेळ झाला आहे!