बंगलुरू – कर्नाटकात अपात्र ठरवण्यात आलेल्या कॉंग्रेस व जेडीएस पक्षाच्या पंधरा आमदारांच्या जागांवर येत्या 5 डिसेंबरला मतदान घेतले जाणार आहे. राज्यातील येडियुरप्पा सरकारचे भवितव्य या पोटनिवडणुकांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व आले आहे.
आम्ही या निवडणुका पुर्ण ताकदीने लढवू असा निर्धार कॉंग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की या जागांसाठी आमची उमेदवार निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय अजून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. त्यांचा निर्णय काय होतोय हे पाहून आम्ही आमची भूमिका निश्चीत करू आणि उमेदवार निवड जाहीर करू असे ते म्हणाले.
या पंधरा बंडखोर आमदारांना भाजपची उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या आधीच घोषित केला आहे. या पंधरापैकी किमान सहा जागा भाजपने जिंकल्या तर त्यांचे बहुमत कायम राहील. राज्य विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत.