– डॉ. मेघश्री दळवी
पृथ्वीवर अचानक एखादी अशनी येऊन आदळली तर काय हाहाकार माजेल, या कल्पनेवर भरपूर चित्रपट निघाले आहेत. त्यात उपायदेखील दाखवतात की पृथ्वीवरून एक यान जाऊन ती अशनी उद्ध्वस्त करतं किंवा धक्का देऊन अशनीची दिशा बदलतं. अलीकडेच नासा या अवकाश संशोधन संस्थेने ही कल्पना प्रत्यक्षात आणली.
या डबल ऍस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट, म्हणजे डार्ट मोहिमेत साधारण एक कोटी किलोमीटर दूरवरची डायमॉर्फसही छोटी अशनी लक्ष्य होती. डायमॉर्फस आणि डिडीमॉस ही अशनींची जोडगोळी आहे. डायमॉर्फस लहान आहे आणि ती डिडीमॉस या मोठ्या अशनीभोवती फिरते. डायमॉर्फसवर यान आदळून तिला किंचित धक्का द्यायचा आणि तिची डिडीमॉसभोवती फिरण्याची कक्षा त्याने किती बदलते याचा अंदाज घ्यायचा अशी ही योजना होती.
त्यानुसार दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये यान पृथ्वीवरून निघालं आणि सप्टेंबर 2022 मध्ये ते डायमॉर्फसवर आदळवण्यात आलं. डायमॉर्फसला डिडीमॉस अशनीभोवती एक फेरी मारायला 11 तास 55 मिनिटं लागत होती. प्राथमिक अंदाजानुसार ही फेरी पूर्ण करायला आता 32 मिनिटं कमी लागतात. आपण इतक्या दुरून अशनीच्या कक्षेत हा बदल घडवून आणला हे खरोखरीच कौतुकास्पद आहे.
त्यानंतर डार्टच्या धक्क्याने झालेल्या परिणामांचा अभ्यास करणारे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले. पृथ्वीवरून मोजमाप करून त्यात डायमॉर्फसच्या कक्षेतील बदल नोंदला आहे. अलीकडे सप्टेंबर 2023 मध्ये मात्र डायमॉर्फस कक्षेत थोडा वेडावाकडा फिरतो आहे असे रिपोर्टस यायला लागले. दरम्यान, हबल दुर्बिणीच्या एका निरीक्षणानुसार डायमॉर्फसमधून तीन ते बावीस फूट इतक्या आकाराचे तुकडे उडालेले आहेत. अशा एकूण 37 तुकड्यांची नोंद हबलने घेतली आहे, त्यांचं वजन डायमॉर्फसच्या एक सहस्त्रांश इतकं अल्प आहे.
म्हणजे डार्टचा धक्का अपेक्षेपेक्षा जास्त बसला असेल का? की पृष्ठभागाच्या कपच्या उडणे हे काही विशेष नाही? की डायमॉर्फसच्या पृष्ठभागावर आधीच हे तुकडे पडलेले होते, ते फक्त इतस्तत: उडाले? या तुकड्यांमुळेच का डायमॉर्फस थोडा डुगडुगतो असं वाटतं आहे? असे अनेक प्रश्न सोडवणे आता जरुरी आहे.
याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीने मोहीम आखली आहे. या मोहिमेत हेरा अवकाशयान 2024 मध्ये दोन क्यूबसॅट्स डायमॉर्फस आणि डिडीमॉसवर उतरवणार आहे. त्यावर रडार आणि मल्टीस्पेक्ट्रल इमेजर असतील आणि ते दोन्ही अशनींविषयी माहिती गोळा करतील. दरम्यान हेरा यान सुरक्षित अंतरावर फिरत असेल.
डार्टच्या धक्क्याने डायमॉर्फसची फक्त कक्षा बदलली, की अशनीवर इतर काही दीर्घकालीन परिणाम दिसून आले याविषयी या मोहिमेतून आपल्याला सखोल माहिती मिळेल. भविष्यात एखादी अशनी पृथ्वीच्या रोखाने येत असेल तर आपल्या संरक्षणासाठी योजना आखताना या सर्व माहितीची मोलाची मदत होणार आहे.