वाडा – खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. करोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत बंद असलेल्या शाळा पुन्हा मुलांनी फुलून आल्या आहेत. विद्यार्थी घरांमध्ये थांबून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले होते. विद्यार्थी शाळेत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.
खेडच्या पश्चिम भागातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ऍड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय-वाडा, सरस्वती विद्यालय-औदर, शिवाजी विद्यालय- डेहणे, माध्यमिक विद्यालय-वाशेरे, भामचंद्र विद्यालय-भांबोली, माध्यमिक विद्यालय- सायगाव या शाळा सुरु झाल्या आहेत.
तर अनेक गावांत कोविड पेशंट सापडत असल्याने त्या ठिकाणी शाळा सुरू करता आल्या नाहीत. विद्यार्थी व शिक्षकांची शाळा सुरू करण्याची इच्छा असूनही शाळा सुरू करता आल्या नाहीत. काही शाळांमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना जवळ बसवून त्यांच्याकडून अभ्यासाचे धडे पूर्ण करून घेत आहेत.
शाळा सुरू करण्यासाठी 8 वी ते 12 वी पर्यंत परवानगी मिळाली असली तरी विद्यार्थ्यांनी शाळेत आलेच पाहिजे, अशी सक्ती नाही, त्यामुळे वर्ग उपस्थिती कमी असते.
कोविडचे नियम पाळून व संबंधितांची परवानगी घेऊन काही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करणे आणि लसीकरण करणे बंधनकारक आहे.