Eknath Khadse – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना रविवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली जावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. ज्यामुळे पुढील काही वेळातच खडसे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले गेले.
दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथम दर्शनी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची स्थिती पाहाता पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला उपचार करण्यात आले. त्यानंतर रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी उड्डाण केले. दरम्यान, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचीही माहिती आहे.