वाघोली – वाघोली येथील रायजिंग स्टार स्कूलच्या स्कुल बसचा केसनंद-वाडेबोल्हाई रोडवर झालेल्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या बस चालकासह स्कूलवर देखील कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम झाला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
चालकाचा बेजबाबदारपणा व भरधाव वेगाने बस चलविल्यामुळेच बसचा अपघात झाला. या अपघाताने मुलांच्या मनावर खूपच गंभीर परिणाम झाला आहे. मुले भीतीच्या छायेखाली वावरत आहे. यामुळे ते झोपत नसून सारखे रडत आहेत. मुलांना प्रत्यक्ष जखमा नसल्या तरी मुक्कामार असण्याची शक्यता आहे. एका मुलावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर एका मुलीला रात्रीच ताप आल्याने पालकांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले.
बससाठी लागणारे शुल्क शाळाच घेते. यामुळे ही जबाबदारी शाळेची आहे. बस वरील चालक वारंवार बदलला जातो. शाळेवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे या पत्रात म्हंटले आहे. पोपट हरगुडे, शिवाजी कोळी, राजा जोश, बिपीन चक्रवर्ती, बाबा जाधव या पालकांनी हे पत्र पोलिसांना दिले आहे.