पुणे – राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे 4 हजार 448 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. यासाठी महाविद्यालय स्तरावर 10, तर विभागस्तरावर 15 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
उच्च शिक्षण विभागामार्फत 14 शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. 2019-20 या वर्षात विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती अर्जांची मुदतीत पडताळणीसाठी वांरवार सूचना दिल्या होत्या. वेळोवेळी मुदतवाढही दिली. मात्र अद्यापही अर्ज प्रलंबित आहेत.
राज्यातील महाविद्यालयांकडून शिष्यवृत्तीसाठी एकूण 2 लाख 20 हजार 531 अर्ज प्राप्त झाले. यातील 1 लाख 76 हजार 321 अर्ज महाविद्यालय व विभागाकडून मंजूर झाले. 21 हजार 770 अर्ज विविध कारणांनी रद्द झाले. 7 हजार 983 अर्ज नाकारले. 10 हजार 9 अर्ज विद्यार्थ्यांकडे पुन्हा पाठवले. 1 लाख 73 हजार 751 विद्यार्थ्यांना एकूण 95 कोटी 18 लाख 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटपही झाली. पुणे विभागातून सर्वाधिक 55 हजार 234 अर्ज आले होते. त्यातील 6 हजार 66 रद्द झाले. 2 हजार 342 नाकारले. या विभागातील 43 हजार 275 विद्यार्थ्यांना 23 कोटी 59 लाख 82 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप झाली.
विभाग – महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज
अमरावती – 412
औरंगाबाद – 1093
जळगाव – 788
कोल्हापूर – 134
मुंबई – 141
नागपूर – 238
नांदेड – 607
पनवेल – 180
पुणे – 642
सोलापूर – 212
महाराष्ट्राबाहेरील -1