नवी दिल्ली – रशियाने कोविड-19 वरील पहिली लस शोधून काढली असून त्या ‘स्पुटनिक व्ही’लसीबाबत भारत रशियाच्या संपर्कात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, या लसीबाबतची प्राथमिक माहिती रशियाने भारताला दिली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रशियात घेतली जात असून या टप्प्यात चाळीस हजार जणांवर याचा प्रयोग केला जात आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या तर भारतात या लसीचे उत्पादन सुरू करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाचे सीईओ किरील दिमित्रीएव्ह यांनी सांगितले, की जगातील अनेक देश या लसीचे भागीदारीत उत्पादन करण्यास उत्सुक आहेत. भारताशी आमचा याबाबतचा करार होऊ घातला आहे.
या लसीच्या भारतासह अन्य देशांतही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतरच या उत्पादनाच्या भागीदारीचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.