पुणे – शहरातील अद्याप सुमारे सव्वालाख नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही घेतला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळेच या नागरिकांसाठी रोजच्या लसीकरण नियोजनात अद्यापही 10 टक्के कोटा ठेवण्यात आला आहे.
सुमारे 10 महिन्यांपासून लसीकरण मोहीम सुरू असून, सुरूवातीला विशेष नागरिकांसाठी ही मोहीम राबवण्यात आली. परंतु 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांत सुमारे 25 ते 26 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र, अजूनही सुमारे सव्वालाख नागरिकांनी लसीचा पहिला डोसही घेतला नाही. त्या नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी महापालिकेने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.
याशिवाय, पुणे शहरात पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे, असे केंद्र आणि राज्य सरकारने यापूर्वीच म्हटले आहे. तर, ज्यांनी अजूनही पहिला डोस घेतला नाही त्यांच्यासाठी दहा टक्के लसीचे डोस महापालिकेने राखीव ठेवले आहेत. जोपर्यंत या सव्वालाख नागरिकांचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत ही सुविधा दिली जाणार आहे.
तर, दुसऱ्या डोसपासून नागरिकांनी वंचित राहू नये आणि त्यांचे लसीकरण वेळेत पूर्व व्हावे, यासाठी 90 टक्के लसीचे डोस हे दुसरा डोस घेणाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी प्राधान्याने लस घेण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागाने केले आहे.