पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 14 जुलैपर्यत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरविल्याने विद्यापीठाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये साधारण 78 पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षा घेऊन, प्रवेश देण्यात येतो. मात्र, 25 अभ्यासक्रमांना केवळ 334 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेपेक्षा कमी अर्ज आल्यामुळे, तेथे प्रवेश द्यावे लागणार आहे.
पुणे विद्यापीठाने मंगळवारी मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे विविध कारणांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची येत्या 22 ते 24 जुलै दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेश विभागाकडून देण्यात आली आहे.