पुणेकर सोडाच, पण पोलीसही हतबल!

पुणे – वाहनांच्या रांगा…”पीक अवर्स’मध्ये कोंडीत व्यर्थ जाणारा वेळ…अपघातांचा धोका…आणि मनस्ताप असा अनुभव विविध चौकांत पुणेकर दररोज घेतात, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ती सोडवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, या प्रयोगांमुळे कोंडीत भर पडत आहे.वारंवार सांगूनही कोंडी फोडण्यासाठी महापालिका तसेच पीएमआरडीए प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे या चौकातील वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत.

सर्वाधिक रहदारी असणाऱ्या पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी रोजचीच बाब झाली होती. शिवाजीनगरकडून औंध आणि बाणेरला जोडणारा पूल नियोजित मेट्रो आणि दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाडण्यात आला. मात्र, यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीला प्रामुख्याने पायाभूत सुविधा, नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरत आहे. त्यात अरुंद रस्ता आणि पदपथामुळे यात भर पडत असल्याचे चित्र या चौकात आहे.

रस्ता कसा ओलांडायचा?
विद्यापीठापासून कॉसमॉस बॅंक चौकापर्यंत रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे नियोजनच नाही. त्यामुळे नागरिकांना बस थांब्यांवर येण्यासाठीदेखील पुणे विद्यापीठ किंवा बॅंकेच्या चौकात जावे लागते. हे अंतर टाळण्यासाठी काही जण जिवाशी खेळत “शॉर्टकट’ वापरत आहेत.

कोंडी टाळण्याच्या नादात वाहने सुसाट
वाहतूक कोंडीत अडकणे टाळण्यासाठी वाहनचालक प्रयत्न करतात. या नादात अनेकदा वाहनाचा वेग वाढवला जातो. याशिवाय मुख्य चौकातील सिग्नल “स्किप’ करण्यासाठी वाहनचालक शक्‍य तितक्‍या अधिक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघाताचा धोका आहे.

“त्या’ वळणाला पर्याय शोधा
विद्यापीठ ते शिवाजीनगर रस्त्यावर बॅरियर उभे आहेत. त्यामुळे वाहने वळवण्यासाठी आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कॉसमॉस बॅंक चौकात यावे लागते. त्यामुळे सेनापती बापट रस्त्याकडे जाणारी वाहने आणि बसेसदेखील वळसा घालून जातात. या “टर्न’मुळे वाहनांची गतीदेखील मंदावत आहे. हे वळण आणि अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकात कर्मचारी कार्यरत असून, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना पूल पाडतेवेळीच वरिष्ठ पातळीवर पीएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मनुष्यबळाचेही नियोजन केले जात आहे.
– प्रकाश मासाळकर, पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक विभाग

“पीक अवर्स’मध्ये अधिक कोंडी

औंध रस्ता, बाणेर रस्ता आणि पाषाण रस्त्याबरोबरच विद्यापीठातून येणारी वाहने, सेनापती बापट रस्त्याकडून वाहने एकाच चौकात येत असल्याने “पीक अवर्स’मध्ये कोंडी वाढत आहे. याशिवाय शहरातून महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने त्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते.

सकाळच्या वेळात शिवाजीनगरकडून औंध, बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या दिशेने आणि सायंकाळच्या वेळी शिवाजीनगरच्या दिशेने वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागतात. पूल पाडल्यानंतर अनलॉकपर्यंत रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे वाहतूकदेखील सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र

वाहनसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे आता कोंडी वाढत आहे, तर आगामी काळात महाविद्यालये, विद्यापीठ आणि आयटी क्षेत्रातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास या रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत भर पडणर आहे. पर्यायाने अधिकच्या कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.