पुणे : लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेच्या ग्राहकांसाठी मोफत पार्किंग

मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी कमी होणार

पुणे- मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी “तुळशीबाग व्यापारी असोसिएशन’ने पुढाकार घेतला आहे. नागरिकांना त्यासाठी मोफत पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी खास “ऍप’ तयार करण्यात आला आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबाग येथे येणाऱ्या ग्राहकांना वाहन पार्किंगसाठी अडचणी येतात. शिवाय, अनेकदा वाहतूक कोंडीही होते. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.

या सेवेचे उद्‌घाटन महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते आणि पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्‍त राहुल श्रीरामे, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडित आणि महालक्ष्मी मेट्रो सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यासाठी तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, मोहन साखरिया, किरण चौहान, संजीव फडतरे, दुर्गेश नवले, गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशनचे संजय मुनोत, “पूना गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार यासाठी प्रयत्न करत आहेत.

आनंद जोशी यांनी “पार्किंग हब’ नावाचे ऍप विकसित केले आहे. त्याच्या सहकार्याने नागरिकांना घरातूनच ऑनलाइन पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. त्यानंतर त्या नागरिकांनी तुळशीबागेतून खरेदी केली की, पार्किंगचे पैसे व्यापारी असोसिएशन देणार आहे.

यामध्ये गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशन, शनिपार असोसिएशन, स्टेशनरी कटलरी ऍन्ड जनरल मर्चंट असोसिएशन, अप्पा बळवंत चौक पुस्तक विक्रेते संघटना, रविवार पेठ कापडगंज, बोहरी आळी व्यापारी असोसिएशन अशा सर्व व्यापारी संघटनांशी चर्चा करून त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे, असे पंडित यांनी सांगितले.

असे करणार पार्किंग स्लॉट उपलब्ध
मनपा वाहनतळाबरोबरच परिसरातील अनेक सहकारी सोसायटी, तसेच परिसरातील शाळांचे व्यवस्थापक यांच्याबरोबर पार्किंग स्लॉट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू आहे. जोगेश्‍वरी गल्लीतील महालक्ष्मी मेट्रो सहकारी गृहरचना सोसायटीने त्यांचे पार्किंग या सेवेसाठी दिले आहे. याशिवाय येथे पार्किंगबरोबरच इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची पण सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये सोसायट्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.