मुंबई – ‘सविता भाभी तू इथेच थांब’ या पोस्टरची चांगलीच चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. सविता भाभी मराठी चित्रपटातील एका भूमिकेचे नाव असून त्याची जाहिरात करण्याकरिता हे पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे.
तर आता प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटातून सविता भाभी या व्यक्तिरेखेची एक्झिट झाली आहे. सविता भाभी या ब्रँडवर आपला हक्क असून या चित्रपटामध्ये हे नाव आणि व्यक्तिरेखा आपल्या परवानगीशिवाय वापरल्याचा दावा एका दिग्दर्शकाने केला होता. यावरून निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अखेर सामोपचाराने हा वाद मिटवण्यात आला असून चित्रपटातून सविता भाभी ही व्यक्तिरेखा काढून टाकण्यात आली आहे.
निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तर आता या चित्रपटातच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दरम्यान, आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने ‘अश्लील’ या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली होती.