शिरवळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या; संशयितांना कठोर शिक्षा देण्याची मागणी
खंडाळा – खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून काल (दि. 16) आत्महत्या केल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रविवारी शिरवळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. पीडित विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल संशयित अक्षय पोपट लांडगे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दोषींना फाशीसारखी कठोर देण्याची मागणी जमावाने केली.
संबंधित विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी तक्रार दाखल का केली, असे विचारून संशयिताच्या दोन साथीदारांनी पीडित मुलीच्या आईचाही विनयभंग केला होता. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस ठाण्यासामोर रविवारी ठिय्या मारला. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे वडील मच्छिंद्र लोखंडे यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयितांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीडितेचे कुटुंबीय व ग्रामस्थांची उद्या, दि. 18 रोजी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घडवून देण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घैतले.
यावेळी उपस्थितांनी समीर शेख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ही घटना अतिशय दुर्दैवी असून, याप्रकरणी कारवाईमध्ये पोलीस कर्मचार्यांकडून दिरंगाई झाली असल्यास त्यांची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शेख यांनी दिले.
शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत, असे आरोप संतप्त जमावाने केला.