सातारा: नागठाणे, काशीळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

दोन दिवसांत चार दुकाने फोडली; बोरगाव पोलिसांसमोर आव्हान

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील बोरगाव व काशीळ येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दिवसांत चार दुकाने फोडली. काशीळ येथे सोमवारी (दि. 18) पहाटे दोन दुकाने फोडून चोरट्यांनी 19,600 रुपये लांबविले. या प्रकरणात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चोरट्यांनी बुधवारी नागठाणे येथील चौकातील दोन दुकाने फोडून सुमारे 53 हजार रुपयांची रोकड लांबवली. या घरफोड्यांमुळे बोरगाव पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत माहिती अशी, स्वप्निल दिनकर माने यांचे काशीळ बसस्थानकासमोर स्वीट मार्ट आणि शेजारी त्यांचे चुलत बंधू दीपक माने यांचे पान शॉप आहे. दीपक माने यांना सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास स्वीट मार्टचे शटर उघडे दिसले. त्यांनी मोबाइलवर संपर्क साधून स्वप्निल यांना कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी दीपक माने यांच्यासोबत दुकानात जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी 19 हजार 600 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे लक्षात आले. स्वप्निल माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

नागठाणे-सासपडे रस्त्यालगत नागठाणे येथे वर्दळीच्या ठिकाणी आपला बझार, त्रिमूर्ती गिफ्ट शॉपी व अन्य दुकाने आहेत. चोरट्यानी बुधवारी पहाटे प्रथम आपला बझारचे शटर उचकटून कॅश काऊंटरमधील 53 हजार रुपयांची रोकड लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी त्रिमूर्ती गिफ्ट शॉपीचे पुढच्या बाजूचे शटर उचकटले. तेथे शॉपीचे पूर्ण डिस्प्ले काऊंटर असल्याने त्यांना आत जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी बोळात जाऊन शॉपीचे दुसरे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केला. तेथेही काऊंटर असल्याने चोरटे निघून गेले.

मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी बोरगाव पोलिसांना माहिती दिली. सपोनि डॉ. सागर वाघ यांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बझारचे व्यवस्थापक बाबासाहेब जयसिंग पाटील (रा. खानापूर, ता. वाळवा, सध्या रा. नागठाणे) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.