आणखी 21 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहर, परिसरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात आणखी 21 बाधित वाढले असून तालुक्याची रुग्णसंख्या 502 वर गेली आहे. गुरुवार पेठ व अमरलक्ष्मी देगाव येथे प्रत्येकी सहा रुग्ण वाढले आहेत. कण्हेरमधील बाधितांची साखळी अजून कायम असून शाहूपुरीतही दोन रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांची धास्ती वाढली आहे.
सातारा तालुक्यातील 96 महसुली गावांमध्ये 481 बाधित सापडले होते. 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सातारा शहरासह तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर जिहे आणि चोरगेवाडी येथील साखळी तोडण्यात यश आले. मात्र अद्यापही कण्हेर मधील साखळी तुटत नाही. शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असतानाही शनिवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी 21 बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याची बाधितांची संख्या 502 झाली आहे.
सातारा तालुक्यातील चिंचणेर येथील 58 वर्षीय महिला, वाढे फाटा, सातारा येथील 44 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी देगाव येथील 38 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 14 वर्षाची युवती, 52 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, येथील 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, 5 वर्षाची बालिका, 5 वर्षाची बालिका, 30 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, अमरलक्ष्मी देगाव येथील 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सेवागिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे.
सातारा शहर परिसरात वाढली रुग्णांची संख्या
सातारा शहरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, राधिका रोड, सदरबझार, शिवमनगर, एमआयडीसी, अमरलक्ष्मी देगाव, कोडोली, गोडोली, शाहूपुरी आदी भागात मोठ्या प्रमाणात करोना बाधित सापडत आहेत. शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढणारी बाधितांची संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट असून प्रशासनाने जलद गतीने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे. शहरातील बुधवार पेठ, गुरुवार पेठ, राधिका रोड हे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असतानाही प्रशासन मात्र ढिम्म झाल्याचे दिसत आहे.