‘कैलासराणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथां भृकुटीं झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःख हारी
तुजवीण शंभो मज कोण तारी..’
अशी शिवस्तुती भक्तजन करतात. या महादेवाच्या गळ्यातील नागराज जिथे प्रत्यक्ष दर्शन देतात, असे स्थान महात्म्य लाभलेले श्री क्षेत्र सोमेश्वर अर्थात सोमयाचे कारंजे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या शिवमंदिरात दर श्रावणी सोमवारी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा बांधली जाते. या आगळ्या वैशिष्ट्यामुळे हे शिवमंदिर शिवभक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ते पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर साखर कारखान्यापासून जवळ कारंजे या गावी आहे.
हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे द्वापारयुगातील मंदिर. चिंचेच्या वनात वसलेले आहे. समुद्र सपाटीपासून अठराशे फूट उंचीवर असणारे ते एकमेव शिवमंदिर आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराच्या प्रांगणात सुंदर दगडी दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन नंदी आहेत. जे इतर शिवालयात आढळत नाहीत. तसेच निर्मळ जलाने तुडूंब भरलेली मोठी बारव आहे. श्रावणी सोमवारी मंदिरात मोठी यात्रा भरते.
मंदिरात प्रवेश केल्यावर आश्चर्यकारक दृश्य दिसते. प्रत्यक्ष नागराजाचे इथे दर्शन घडते, या नागाला स्थानिक लोक “स्वारी येणे’ असे म्हणतात. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच नागाच्या रूपात इथे येतात, अशी आख्यायिका आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारी येथे मिरवणूक निघते.
– माधुरी शिवाजी विधाटे