पुणे – भारतात गेल्या काही वर्षांपासून चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जात आहेत. पुण्यालाही भव्य विमानतळ लवकरच उभारण्यात येणार आहे. तसेच, आताच्या लोहगाव विमानतळ धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सरकारने रोडमॅप तयार करण्यात आला आहे. पुण्यातील लोहगाव टर्मिनलचे उद्घाटन लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
रूबी हॉल क्लिनिकच्या वतीने हॉटेल रित्झ कार्लटन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, डॉ. सायमन ग्रँट, बेहराम खोदाईजी उपस्थित होते.
श्रीपाद नाईक म्हणाले की, आयुष्मान भारत’ योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. त्याहीपुढे जाऊन रुग्णांना मदत मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, मेडिकल टुरिझम पुण्यात पुढे जाण्यासाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असणे आवश्यक आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणे विस्तार होण्याची क्षमता मेडिकल टुरिझम मध्ये आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा.