आ. शशिकांत शिंदे; असंघटित कामगारांचे प्रश्न मार्गी लावू
सातारा – सातारा जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा असून, जिल्ह्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन आ. शशिकात शिंदे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कामगार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्याचे प्रभारी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, उपाध्यक्ष समींद्रा जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संजनाताई जगदाळे, संगीता साळुंखे, गोरखनाथ नलवडे, बंडू ढमाळ, संतोष ननावरे, अतुल शिंदे, प्रा. कविता म्हेत्रे, डॉ. नितीन सावंत, मकरंद बोडके, शफीक शेख, रमेश उबाळे, पूजा काळे, सचिन जाधव, संजय पिसाळ उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, असंघटित कामगारांना भेडसावणार्या समस्यांचे योग्य निराकरण न झाल्यास, कामगारांनी माझ्याशी संपर्क साधावा. कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी संघटनात्मक बांधणी आणि बुथनिहाय कमिट्यांचे योग्य नियोजन करावे. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहून पक्षाची ताकद दाखवून द्यावी.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, पक्ष संघटनेत नव्याने पदाधिकार्यांची नियुक्ती केली असून, जुन्या व नव्या पदाधिकार्यांनी मिळून पक्षसंघटन मजबूत करावे. लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपेक्षा दोन महिने अगोदर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकार्यांनी आपल्या गावातील मतदारयाद्या परिपूर्ण आहेत का, याचा आढावा घ्यावा. त्याबाबत काही अडचणी असल्यास पक्षाने नेमलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, सर्व फ्रंटल सेलच्या पदाधिकार्यांनी तालुकानिहाय कार्यकारिणी आठ दिवसात कार्यान्वित करावी. गावपातळीवर, बुथ कमिट्यांसाठी काही अडचण आल्यास मला भेटावे. सर्व कमिट्यामध्ये फ्रंटल सेलच्या पदाधिकार्यांचा समावेश करावा. त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करावी. ‘मी महाराष्ट्रवादी’ अभियानाची पदाधिकार्यांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी.
बैठकीला राष्ट्रवादी भवनात गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे गट पडल्यानंतरही जिल्ह्यात शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी भवनात रविवारी झालेल्या बैठकीवेळी हे दिसून आले. जिल्ह्यातून ज्येष्ठ पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा वर्गाची उपस्थिती लक्षवेधक होती. शरद पवार यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू. त्यांना व राष्ट्रवादीला कमीपणा येईल, असे कृत्य कोणी करणार नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.