35 बेडस्सह अद्यायवत सुविधा; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलात आता यापुढे एकही पोलीस अधिकारी वा कर्मचारी करोनाचा बळी ठरणार नाही. पोलीस परेड ग्राऊंडवर स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पोलीस शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या मनातील करोनाची भीती घालविणे आणि करोनाशी लढा देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे त्यांच्या हक्काचे कोविड रुग्णालय रविवारी सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या रुग्णालयात 35 बेडस्सह अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपमुख्य वनसंरक्षक भारतसिंह हाडा, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, डॉ. संग्राम देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय भागवत व मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यात आतापर्यंत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रोज वाढणारी रुग्णसंख्या पाहता पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस दलातील करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यावर देणार असल्याचे रामराजे यांनी यांनी स्पष्ट केले. साताऱ्याचा इतिहास साक्षी ठेवून, राजकीय मतभेद विसरून जिल्हावासीयांच्या व पोलिसांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. बाळासाहेब पाटील म्हणाले, पोलिसांसाठी उभे केलेले हे हॉस्पिटल पोलीस व जिल्हावासीयांसाठी संजीवनी ठरेल. या हॉस्पिटलचे नामकरण “चैतन्य’ असे करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मनोजकुमार लोहिया म्हणाले, जिल्हा पोलीस दलासाठी असलेले हे हॉस्पिटल सर्वांसाठी चैतन्यदायी ठरेल.
पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकऱ्यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी केलेले हे “तेजस्वी’ काम राज्याला दिशादर्शक ठरेल. करोनाच्या काळात जनतेची अहोरात्र सेवा करणारे पोलीसही संक्रमित होत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात पावणेतीनशे पोलीस बाधित झाले असून त्यात चार जण मृत्युमुखी पडले. पोलिसांमधील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवताना गृहमंत्री अनिल देशमुख, आयजी मनोजकुमार लोहिया, पालकमंत्री व मान्यवरांकडून प्रेरणा मिळते. करोनावरील उपचारांसाठी पोलिसांचे रोज येणारे फोन अस्वस्थ करत होते. त्यातूनच पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल उभारण्याची कल्पना सुचली. सर्वांच्या सहकार्याने त्याला मूर्त रूप आल्याचा आनंद असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. धीरज पाटील यांनी आभार मानले.
कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू
पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय बुधवारी (दि. 9) रोजी घेण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, बी. बी. महामुनी, राजेंद्र साळुंखे, अजित टिके, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सर्जेराव पाटील, उमेश हजारे, संदीप भागवत, सपोनि विश्वजित घोडके, फौजदार गणेश वाघ, अधिकारी, कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमात अधिकारी दंग असताना दुसरीकडे गेले चार दिवस पोलीस परेड ग्राउंडवर मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवर कार्यपूर्तीचे समाधान व डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते.