सातारा (प्रतिनिधी) – खा. उदयनराजे भोसले हे धक्कातंत्रासाठी माहीर असल्याची प्रचिती शुक्रवारी सातारकरांना ग्रेड सेपरेटरच्या अचानक झालेल्या उद्घाटनामुळे आली. आता या धक्कातंत्राची पुनरावृत्ती उद्या, दि. 11 रोजी पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीतही होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सातारा पालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाल 3 जानेवारीला पूर्ण झाल्याने या पदांच्या निवडीसाठी उद्या, दि. 11 रोजी विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पालिकेत उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपासून चार वर्षांमध्ये त्यांनी 15 नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदी वा सभापतिपदी काम करण्याची संधी दिली; परंतु काही नगरसेविकांवर अद्याप कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही.
आजवर त्यांना केवळ चर्चेवर समाधान मानावे लागले. सातारा शहराची नुकतीच झालेली हद्दवाढ आणि आगामी पालिका निवडणुकीमुळे या सभापती निवडीला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे गतिशील व कृतिशील नगरसेवकांना यंदा सभापतिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.
सर्व सभापतिपदांवर महिलांची वर्णी लागणार अशी चर्चा आहे; परंतु उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्र सर्वपरिचित आहे. जबाबदाऱ्या सोपविल्याशिवाय नेतृत्व घडत नाही, असे उदयनराजे नेहमी सांगतात. त्यामुळे यंदा जुन्या व अनुभवी नगरसेवकांना सभापतिपदी संधी मिळणार की नव्या नगरसेवकांच्या गळ्यात माळा पडणार का, याचे उत्तर फक्त उदयनराजे भोसले यांच्याकडेच आहे. हे उत्तर उद्या (सोमवार) होणाऱ्या विशेष सभेत मिळणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभापतिपदांसाठी संभाव्य नावे
- पाणी पुरवठा समिती – सीता हादगे
- महिला व बालकल्याण समिती – रजनी जेधे
- आरोग्य समिती – अनिता घोरपडे (मुदतवाढ?)
- बांधकाम समिती – लता पवार
- नियोजन समिती – स्नेहा नलावडे