सातारा – खोजेवाडी (ता. सातारा) येथे आल्याच्या शेतामध्ये गांजाची 18 झाडे लावणाऱ्या लहू कुंडलीक घोरपडे (वय 62, रा. खोजेवाडी) या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. गांजाच्या 18 झाडांचे 109 किलो वजन भरले असून त्याची किंमत 27 लाख 34 हजार 500 रुपये आहे, पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ व्यापाऱ्यांसंदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खोजेवाडी येथे गांजाची शेती होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गावात जाऊन माहिती घेतली असता घोरपडे यांनी त्यांच्या आल्याच्या शेतामध्ये गांजाच्या 18 झाडांची लागवड केली होती असे आढळून आले. पोलिसांनी 109 किलो वजनाची गांजाची 18 झाडे जप्त केली.
बाजारपेठेमध्ये या गांजाची 27 लाख 34 हजार 500 रुपये किंमत आहे. घोरपडे याच्यावर उत्तेजक द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी इंगवले, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने यांनी भाग घेतला.