सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण रखडले
“जी-20′, पाऊस आणि निधी उपलब्ध नसल्याचे दिले कारण
पुणे – पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम रखडले आहे. “जी-20′ तसेच पाऊस यामुळे या कामास विलंब झाल्याची कबुली विद्यापीठाकडून देण्यात आली.
विद्यापीठात दि.14 फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण रेंगाळल्यावरून अधिसभा सदस्यांनीही विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानुसार शनिवारी (दि.28) विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) होत आहे.
सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी याबाबत संदर्भात प्रश्न विचारला आहे. ज्यांच्या नावामुळे विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला, त्यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध नाही? 600 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणाऱ्या विद्यापीठाकडे निधी कसा नाही? याचे उत्तर विद्यापीठाला अधिसभेत उत्तर द्यावेच लागेल, याकडे शिनलकर यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, शनिवारी होणारी अधिसभा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध झालेले चुकीचे निकाल, अंतर्गत गुणावरून विद्यार्थ्यांचे नुकसान, विद्यापीठात चित्रीत झालेले रॅप सॉंग, अशा मुद्द्यांवरून वादळी ठरणार आहे.
विद्यापीठ प्रशासन म्हणते की…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “जी-20′ परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पावसामुळे या कामास विलंब झाला. सदर पुतळा सुशोभिकरणासाठी जवळपास तीन कोटींची घोषणा करण्यात आली. तसा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठविला आहे. दि. 3 जानेवारीपर्यंत सुशोभिकरणाचे काम बहुतांशी पूर्ण होईल, असे पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.