पाचगणी – केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत पाचगणी पालिकेने पश्चिम विभागत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नवी दिल्ली येथील भारत मंडपम् कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय स्वच्छ भारत संचालनालयाच्या संचालिका रूपा मिश्रा, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव मनोज शर्मा यांच्या हस्ते पालिकेला गौरविण्यात आले. पाचगणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘स्वच्छ भारत नागरी’ अभियानात पाचगणी नगरपरिषदेने 2023 साठीचा पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रशासकीय राजवटीत नगरपरिषदेने केलेल्या कामगिरीबद्दल कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे कौतुक होत आहे. ते म्हणाले, हा पुरस्कार पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणार्या प्रत्येकाचा आहे. पालिकेचे कर्मचारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळवू शकलो. यापुढेही पाचगणीकरांच्या सहकार्याने पर्यटननगरी आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
पुरस्कारांची हॅट्ट्रिक
स्वच्छता अभियानामध्ये पश्चिम विभागात पाचगणी नगरपरिषदेस 2018 साली पहिल्यांदा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2021 साली या पुरस्काराला पालिकेने पुन्हा गवसणी घातली होती. आता प्रशासकीय राजवटीत पुरस्कार मिळवून नगरपरिषदेने हॅट्रिक साधली आहे.